जळगाव - अरुंद जागा, रंग उडालेल्या भिंती आणि गळके छत असे नकोसे वाटणाऱ्या घराऐवजी प्रशस्त, चकचकीत 'टू बीएचके' फ्लॅट जळगाव पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार आहे. पोलीस मुख्यालयात उभारण्यात आलेली २५२ ब्लॉक असलेल्या ६ टुमदार इमारतींच्या फ्लॅट स्कीमचे काम पूर्णत्वास आले असून, घरांच्या हस्तांतरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. येत्या २ ते ३ महिन्यात पोलीस दादांचे कुटुंबीय या घरांमध्ये वास्तव्य करतील.
जळगाव पोलीस दलाच्या मुख्यालयात पोलीस कर्मचार्यांच्या घरांचे बांधकाम सुरू आहे. या संपूर्ण २५२ घरांचे बांधकाम पूर्ण झाले असून, सद्यस्थितीत कलरींग, फिटींग यासह इतर किरकोळ कामे सुरू आहेत. २ ते ३ महिन्यानंतर संपूर्ण २५२ घरे पूर्णत्वास येतील व पोलीस दलाला हस्तांतरित केली जातील, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली आहे.
चंदीगडच्या कंपनीकडे आहे कामाचा ठेका -
पोलीस दलात कार्यरत कर्मचार्यांसाठी पोलीस वसाहतीत घरे आहेत. मात्र, ही घरे अत्यंत जुनी झालेली आहेत. त्यामुळे पोलीस कुटुंबीयांना अडचणींचा सामना करावा लागत होता. २०१९ मध्ये पोलीस मुख्यालय असलेल्या आवारातील मोकळ्या जागेत पोलीस कर्मचार्यांसाठी नवीन २५२ घरे बांधण्यासाठी शासनाकडून मंजुरी मिळाली होती. चंदीगड येथील बी. एल. मेहता या कन्ट्रक्शन कंपनीला या घरांच्या बांधकामाचा ठेका मिळाला होता. बी. एल. मेहता कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक विष्णू शर्मा, प्रकल्प अभियंता सतीश परदेशी यांच्या नेतृत्वात इलेक्ट्रीकल्स इंजिनिअर, सेफ्टी इंजिनिअर, बिलिंग इंजिनिअर व ४ साईट इंजिनिअर, ६ सुपरवायझर तसेच ४०० परप्रांतीय कामगार अशा टीमकडून गेल्या २ वर्षांपासून या घरांचे बांधकाम सुरू आहे. कोरोनामुळे या प्रकल्पाला काहीसा उशीर झाला आहे.
अत्याधुनिक सुविधा मिळणार -
पोलीस कर्मचार्यांच्या घरांसह एक प्रशासकीय इमारत याठिकाणी साकारण्यात येत आहे. घरांच्या ६ स्वतंत्र इमारती असून, एका इमारतीमध्ये ४२ फ्लॅट आहेत. २ रूम, किचन व हॉल असे ४ खोल्यांचे घर असणार आहे. प्रत्येक इमारतींमध्ये २ स्वतंत्र लिफ्ट तसेच पाण्याची टाकी राहणार आहे. अंडर ग्राउंड इलेक्ट्रींक फिटींगसह इतर अत्याधुनिक सुविधा याठिकाणी राहणार आहेत.
पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बाब -
फ्लोअरिंग, टॉयलेट फिटींग, नळ फिटींग, इलेक्ट्रिक फिटींग अशी कामे सद्यस्थितीत सुरू आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर रंगकाम पूर्ण केले जाणार आहे. सर्व कामे पूर्ण होवून लवकरच घरांसह प्रशासकीय इमारतीचे हस्तांतरण केले जाईल. पूर्वीच्या घरांपेक्षा जास्तीचे चटई क्षेत्र व अत्याधुनिक सुविधा या घरांमध्ये राहणार असून पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बाब असल्याचेही पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी सांगितले.