जळगाव - कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार 24 मार्चपासून सर्वत्र लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. मात्र, काहीजण विनाकारण शहरात फिरत आहेत. त्यामुळे आता पोलिसांनी थेट कडक कारवाईचा बडगा उगारलाय. शहरात पोलिसांच्यावतीने गुरुवारी दिवसभरात वेगवेगळ्या ठिकाणांहून 30पेक्षा अधिक दुचाकी तसेच रिक्षा जप्त करण्यात आल्या आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केले असतानादेखील नागरिक बेपर्वाईने वागत आहेत. काहीजण कोणत्याही प्रकारची गरज नसताना बाहेर फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यातच गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. लॉकडाऊनच्या काळात विनाकारण बाहेर हिंडणाऱ्या लोकांची वाहने जप्त करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे तसेच पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी दिले आहेत. यानंतर बुधवारी रात्रीपासूनच कारवाईला सुरुवात झाली आहे. शहर, जिल्हापेठ, रामानंदनगर, शनीपेठ तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या आवारात ठिकठिकाणी नाकेबंदी करून विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची वाहने जप्त केली आहेत. त्याचप्रमाणे लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शहर पोलिसांनी 24 तर जिल्हापेठ पोलिसांनी पकडल्या 6 दुचाकी
बुधवारी रात्रीपासून सुरू झालेल्या कारवाईत जिल्हापेठ पोलिसांनी 6 तर शहर पोलिसांनी 24 अशा 30 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी पोलिसांनी विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना चांगलाच चोप दिलाय. लॉकडाऊनच्या नवव्या दिवशी शहर पोलिसांनी शहरातील टॉवर चौक, चित्रा चौक, सुभाष चौक आणि भिलपुरा या परिसरात विनाकारण बाहेर फिरणारे कांतिलाल रामचंद्र बारी, सुनील रामसिंग अलकारी, मयूर रवींद्र शिंपी, जगदीश रामकृष्ण पाटील, शशिकांत शंकरराव कोकाटे, प्रफुल्ल श्रीकांत भोरटक्के, प्रदीप मधुकर वाघ, आरिफ जाहीद देशमुख, सिद्दीकी कादरी मनियार, अरबाज गफ्फार मनियार, शुभम राजेंद्र सोनवणे, किरण सुभाष कोळी, संजय प्रभाकर चौधरी, सम्राट सुरेश सोनवणे, सोपान सुभाष शिरसाट, रोहीत संजय साळुंखे या 17 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून 16 दुचाकी जप्त केल्या आहेत.