जळगाव - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. या काळात विनाकारण घराबाहेर पडण्यास मनाई असताना जळगाव शहरातील गणेश कॉलनीत एका अपार्टमेंटमध्ये मात्र, कुंटणखाना सुरू होता. या कुंटणखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. बुधवारी दुपारी साडेचार वाजता ही कारवाई करण्यात आली. तेथून पोलिसांनी 2 दलाल, कुंटणखाना चालवणारी महिला व एका पीडित तरुणीला ताब्यात घेतले. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
२३ वर्षीय कुंटणखाना चालवणारी महिला, कमलेश केशरसिंग सिसोदिया (वय २०, रा. धारतांडा, जि. धार, मध्यप्रदेश) व प्रवीण सीताराम आहेर (वय ३०, रा. कॅम्परोड, मालेगाव) अशी दलालांची नावे आहेत. एक २३ वर्षीय पीडित तरुणी येथे मिळून आली. या अपार्टमेंटमध्ये कुंटणखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम, सहाय्यक पोलीस निरीक्षक निता कायटे यांच्या पथकाने दुपारी साडेचारच्या सुमारास छापा टाकला. तत्पूर्वी कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेकडे एक डमी कस्टमर पाठवला होता. खात्री झाल्यानंतर पथकाने छापा मारुन कारवाई केली. या प्रकरणी निता कायटे यांच्या फिर्यादीवरुन २३ वर्षीय कुंटणखाना चालवणारी महिला, कमलेश सिसोदिया व प्रवीण आहेर यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चार लाखांची कार जप्त, दुसऱ्यांदा गुन्हा -
कुंटणखाना चालवणाऱ्या २३ वर्षीय महिलेची दोन महिन्यांपूर्वीच प्रसूति झाली आहे. ती कमलेश व प्रवीण यांच्यासोबत गेल्या १५ दिवसांपासून गणेश कॉलनीतील एका अपार्टमेंटमध्ये राहण्यासाठी आली आहे. या कारवाईत पोलिसांनी कमलेश याच्या मालकीची चार लाखांची चारचाकी (एमएच १८ डब्ल्यू २२२) जप्त केली आहे. २३ वर्षीय कुंटणखाना चालवणाऱ्या या महिलेविरुद्ध दोन वर्षांपूर्वीच याच प्रकारे रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा दाखल आहे.
लॉक डाऊनचा फायदा घेण्याचा डाव उधळला -
लॉकडाऊनच्या काळात बाहेर वर्दळ कमी झाली आहे. अशा परिस्थितीचा फायदा घेऊन कुंटणखाना सुरू होता. मात्र, पोलिसांनी अखेर हा डाव उधळला आहे. शहरातील गणेश कॉलनी हा परिसर उच्चभ्रू मानला जातो, याच ठिकाणी कुंटणखाना सुरू असल्याने खळबळ उडाली आहे.