जळगाव - काेराेनाचा प्रसार राेखण्यासाठी साेशल डिस्टन्सिंग हेच प्रभावी हत्यार असून, भाजीपाला बाजारात हाेणाऱ्या गर्दीमुळे त्याला हरताळ फासला जात आहे. त्यावर उपाय म्हणून पालिका प्रशासनाने खुल्या मैदानावर भाजी बाजार भरवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जीएस मैदान आणि रामदास काॅलनीतील मैदानावर भाजी बाजार भरवण्यात येणार आहे. त्यासाठी स्वच्छता आणि सपाटीकरण करून आखणी करण्यात आली.
पालिकेतर्फे जीएस मैदान आणि रामदास कॉलनीच्या महापालिकेच्या खुल्या भूखंडावर आखणी केली. महापौर भारती सोनवणे आणि उपायुक्त अजित मुठे यांनी जागांची पाहणी केली. भाजी बाजारात हाेणाऱ्या गर्दीबाबत महापौर सोनवणे यांनी आयुक्त सतीश कुलकर्णी यांना पालिकेच्या खुल्या जागांवर भाजी बाजार भरविण्याचे सूचना पत्राद्वारे केली होती. पालिका प्रशासनाने सकाळी जी. एस. मैदान, रामदास कॉलनी या दाेन खुल्या मैदानाची स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या वेळी महापौर भारती सोनवणे, उपायुक्त अजित मुठे, नगरसेवक कैलास सोनवणे, अतिक्रमण अधीक्षक एच. एम. खान तसेच हॉकर्स संघटनेचे प्रभाकर तायडे आदी उपस्थित होते. जीएस मैदानावर ५० तर रामदास काॅलनीच्या मैदानावर ३० ते ३५ हाॅकर्स बसवण्यात येणार आहेत. दाेन विक्रेत्यांमध्ये २० फूटाचे अंतर ठेवण्यात आले आहे.
शहरात आणखी काही ठिकाणी भरणार बाजार -
लाॅकडाऊनच्या काळात विक्रेत्यांकडून बाजारशुल्क न आकारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. शहरात जुनी नगरपालिकेची जागा, मानराज पार्क येथील मोकळ्या मैदानावर बाजार तयार करण्याचे पालिकेचे नियाेजन आहे. भाजी बाजारात हाेणारी गर्दी टाळण्यासाठी पालिकेकडून मोकळ्या मैदानात सुटसुटीत बाजार लवकरच तयार केला जात असून गर्दी न करता नागरिकांनी खरेदी करावी, असे आवाहन महापाैर साेनवणे यांनी केले आहे.