जळगाव - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात तब्बल सव्वादोन महिन्यांनी जळगावातील बाजारपेठ सुरू झाली. लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात राज्य सरकारने काहीअंशी शिथिलता दिली आहे. त्यानुसार जळगावात शुक्रवारपासून मॉल्स आणि व्यापारी संकुल वगळता बाजारपेठेतील इलेक्ट्रॉनिक, कापड, हार्डवेअरची दुकाने उघडली. खरेदीसाठी नागरिकदेखील बाहेर पडल्याने ठप्प असलेले व्यवहार पुन्हा सुरू झाले. दरम्यान, जिल्हा तसेच महापालिका प्रशासनाने बाजारपेठेतील दुकाने सुरू करण्याबाबत नेमके मार्गदर्शन न केल्याने बहुतांश व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने 23 मार्चपासून शहरातील बाजारपेठेतील सर्वच व्यवहार बंद होते. अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता सर्व काही ठप्प झाले होते. त्यामुळे व्यापारीनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावचे अर्थकारण थांबले होते. मात्र, आता सव्वादोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीनंतर लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात राज्य सरकारने हळूहळू शिथिलता प्रदान करणे सुरू केले आहे. त्यानुसार, शुक्रवारपासून जळगावातील मॉल्स आणि व्यापारी संकुलातील दुकाने वगळता इतर दुकाने सुरू झाली.
दरम्यान, जळगाव बाजारपेठेतील महात्मा फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केट, गोलाणी मार्केट, जुने व नवे बीजे मार्केट, महात्मा गांधी मार्केट, नाथ प्लाझा, भास्कर मार्केट अशी अनेक व्यापारी संकुले असून त्याठिकाणी हजारोंच्या संख्येने इलेक्ट्रॉनिक वस्तुंची, कापड, किराणा व भुसार मालाची दुकाने आहेत. परंतु, राज्य सरकारने मॉल्स आणि व्यापारी संकुलातील दुकाने उघडण्यास परवानगी दिलेली नाही. याच पार्श्वभूमीवर जळगावातील व्यापारीवर्गातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
प्रशासनाने दुकाने उघडण्यासंदर्भात मार्गदर्शन करायला हवे. दुकाने 'ऑड-इव्हन' पद्धतीने उघडायची की बंद ठेवायची याची माहिती नाही. दोन ते अडीच महिन्यांपासून दुकाने बंद असल्याने अर्थकारण थांबले आहे. उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुकानांमध्ये काम करणारे मदतनीस, कामगार यांच्याही उपजीविकेचा प्रश्न आहे. तरी सरकार आणि जिल्हा प्रशासनाने याबाबत तोडगा काढायला हवा, अशी मागणी व्यापारीवर्गातून केली जात आहे.
जळगाव शहरात दाणाबाजार, सुवर्णबाजार तसेच कृषी व औद्योगिक क्षेत्रासाठी लागणाऱ्या साधन सामग्रीची बाजारपेठ मोठी आहे. याठिकाणी जिल्ह्यासह परजिल्ह्यातील खरेदीदार येत असतात. त्यामुळे जळगावातील बाजारपेठेतील सर्व व्यवहार लक्षात घेतले तर दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. मात्र, अलीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही उलाढाल थांबली होती. आता बाजारपेठ सुरू झाल्याने परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येईल, अशी अपेक्षा आहे.