जळगाव - इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. ही कारवाई 7 ऑक्टोबर रोजी रात्री शिवकॉलनी परिसरातील गंगासागर अपार्टमेंटमध्ये असलेल्या एका फ्लॅटमध्ये करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी योगेश प्रदीप महाजन (वय 26, रा. गंगासागर अपार्टमेंट, शिवकॉलनी, जळगाव) आणि राजेंद्र श्रीराम पाटील (वय 39, रा. प्लॉट नंबर 3/2, गुरुदत्त कॉलनी, पिंप्राळा,जळगाव) यांना अटक केली आहे.
आरोपी योगेश महाजन याच्या राहत्या घरात आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांवर ऑनलाइन पद्धतीने फोनवरून सट्टा घेतला जात होता. बुधवारी आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडरर्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज या दोन्ही संघांमध्ये क्रिकेटचा सामना खेळवला जात होता. या सामन्यावर शिवकॉलनीतील गंगासागर अपार्टमेंटमध्ये सट्टा घेतला जात असल्याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस हेडकॉन्स्टेबल विजयसिंग पाटील यांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार हेडकॉन्स्टेबल पाटील यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांनी सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल नाईक, पोलीस उपनिरीक्षक अंगद नेमाणे, सहायक फौजदार अशोक महाजन, अनिल जाधव, गोरक्षनाथ बागुल, महेश महाजन, दत्तात्रय बडगुजर, अविनाश देवरे, उमेशगिरी गोसावी, महिला पोलीस नाईक सविता परदेशी यांचे पथक कारवाईसाठी रवाना केले होते. या पथकाने गंगासागर अपार्टमेंटमध्ये योगेश महाजन याच्या राहत्या घरात छापा टाकला. त्यात महाजन हा राजेंद्र पाटील याच्यासह आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेत असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांच्या पथकाने दोघांना अटक करत तेथून 1 लाख 27 हजार रुपये किंमतीचे टीव्ही, सेटटॉप बॉक्स, रिमोट, पेनड्राइव्ह, लॅपटॉप तसेच 10 मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोघांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.