जळगाव - जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील राणीचे बांबरुड येथे राहणाऱ्या एका अट्टल दुचाकी चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या ७ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या चोरीच्या दुचाकी खरेदी करणाऱ्या ३ जणांवर देखील पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. किरण तुकाराम बारेला (वय २५, मुळ रा. दुधखेडा, ता. वारला, जि. बडवाणी, मध्यप्रदेश) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
किरण याचा साथीदार नाना रायसिंग वासकले (वय २२, रा. जामठी, ता. वारला, जि. बडवाणी, मध्यप्रदेश) हा बेपत्ता आहे. किरणकडून चोरीच्या दुचाकी खरेदी करणारे मनोज उर्फ मुन्ना कालम वंजारी (राठोड, रा. गंगानगर बलवाडी, मध्यप्रदेश), गुणीलाल भल्या पावरा (वय ३०, रा. मेलाने, ता. चोपडा) व सुभाष पावरा (वय ३०, रा. घेगाव, मध्यप्रदेश) या तिघांवरही संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये चोरीच्या वस्तू खरेदी केल्या प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत.
किरण हा काही वर्षांपासून राणीचे बांबरुड येथे रहिवासाला आला आहे. शेतमजुरी करुन तो उदरनिर्वाह करीत असताना त्याला दुचाकी चोरीची सवय लागली. यानंतर त्याने जळगाव शहर पोलीस ठाणे, पारोळा, मलकापूर, नाशिक व शहादा येथून दुचाकी चोरी केल्या. या दुचाकी तो महाराष्ट्र, मध्यप्रदेश सीमावर्ती भागात कमी किमतीत विकत होता.
किरणबद्दलची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी दीपक शिंदे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक बापू रोहोम, नारायण पाटील, रामचंद्र बोरसे, सुनील दामोदरे, मनोज दुसाने, महेश महाजन, महेश पाटील, प्रवीण हिवराळे, दीपक शिंदे, अरुण राजपूत, परेश महाजन यांच्या पथकाने सापळा रचून मंगळवारी (१० मार्च) किरण याला ताब्यात घेतले.
पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून ७ दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. या दुचाकी खरेदी करणाऱ्यांवरही गुन्हे दाखल झाले आहे.