जळगाव - जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोना पॉझिटिव्ह असलेला एकमेव रुग्ण आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा हा ऑरेंज झोनमध्ये असून राज्य सरकारच्या निर्देशानुसार सोमवारपासून जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये काही अंशी शिथिलता देण्यात आली आहे. मात्र, लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या सवलतीचा फायदा घेत जळगावात नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याचे पाहायला मिळत आहे. शहरातील प्रत्येक रस्त्यासह बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. सर्वत्र सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी 3 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, अर्थव्यवस्था ठप्प होऊ नये, यासाठी ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यांमध्ये सोमवारपासून काही अंशी शिथिलता देण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. त्यानंतर लगेचच 4 दिवसांनी म्हणजेच, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दुसरा रुग्ण आढळला होता. धक्कादायक बाब म्हणजे, दुसऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा अवघ्या 24 तासातच मृत्यू झाला होता. मात्र, पुढे जिल्ह्यातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचारादरम्यान पूर्णपणे बरा झाला होता. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नव्हता. पण जिल्हा ग्रीन झोनमध्ये येईल, अशी अपेक्षा असताना जळगावात पुन्हा एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली. म्हणून जिल्हा ऑरेंज झोनमध्येच अडकला. सद्यस्थितीत जिल्ह्यात एकच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याने लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे.
पोलीस बंदोबस्त हटवला-
लॉकडाऊनच्या काळात शहरातील प्रत्येक चौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याशिवाय पोलिसांची वाहनांद्वारे पेट्रोलिंग देखील सुरू होती. मात्र, सोमवारी लॉकडाऊनमध्ये काहीअंशी शिथिलता दिल्याने पोलीस बंदोबस्त हटविण्यात आला होता. मोजक्या ठिकाणी पेट्रोलिंग सुरू होती. पोलीस ध्वनिक्षेपकावरून नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, तोंडाला मास्क बांधा, असे आवाहन करत होते.