जळगाव - सुमारे ११८ कोटी रुपये किंमतीच्या केटामाईनची तस्करी केल्याचा दोषारोप सिद्ध झाल्याने शुक्रवारी जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने ७ आरोपींना विविध कलमान्वये सश्रम कारावासाची तसेच आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली. आरोपींना ठोठावलेल्या दंडाची रक्कम राज्य शासनाच्या तिजोरीत जमा करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
वरूण कुमार तिवारी (वय ४२, रा. विक्रोळी, मुंबई), जी. श्रीनिवास राव (वय ५२, रा. पवई, मुंबई), नितीन चिंचोले (वय ५६, रा. जळगाव), विकास पुरी (वय ४८, रा. पवई, मुंबई), खेमा मधुकर झोपे (वय ४७, रा. अंबरनाथ, जि. ठाणे), रजनीश ठाकूर (वय ५०, रा. सिकंदराबाद, आंध्रप्रदेश) व एस.एम. सेन्थीलकुमार (वय ४०, रा. चेन्नई) अशी शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत.
या खटल्यात गौरी प्रसाद पाल (वय ५६, रा. विक्रोळी, मुंबई), नित्यानंद थेवर (वय ३२, रा. धारावी, मुंबई), कांतीलाल उत्तम सोनवणे (वय ३४, रा. उमाळा, जळगाव), विशाल सोमनाथ पुरी (वय ४५ , रा. जनकनगरी, नवी दिल्ली) व विलास रामचंद्र चिंचोले (वय ६८, रा. जळगाव) या ५ जणांना निर्दोष सोडण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण -
मुंबई येथील डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सच्या (डीआरआय) पथकाने १२ डिसेंबर २०१३ला जळगाव तालुक्यातील उमाळा शिवारातील आयोसिंथेटीक या कंपनीवर छापा मारला होता. यावेळी तेथे एका कारमध्ये प्रत्येकी ४५ किलोग्रॅम वजनाच्या केटामाईनच्या चार गोण्या मिळून आल्या होत्या. मिळालेल्या माहितीवरून धुळे येथे एका हॉटेलमध्ये छापा मारुन वरुण तिवारी याला ताब्यात घेण्यात आले होते. धुळ्यातून ही एक चारचाकी जप्त केली होती. त्यातही केटामाईन मिळाले होते. एका रात्रीत एकूण १ हजार १७५ किलो केटामाईन या पथकाने जप्त केले होते. या प्रकरणी काही दिवस पोलिसांनी चौकशी करुन एकूण १२ संशयितांना अटक केली होती.
44 साक्षीदार तपासले -
या प्रकरणात ३ सप्टेंबर २०१६ ला जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. न्यायाधीश एस.जी. ठुबे यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. डीआयआयतर्फे अॅड. अतुल सरपांडे व जळगावचे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता संभाजी पाटील यांनी खटल्याचे कामकाज पाहिले. या खटल्यात एकूण ४४ साक्षीदार तपासण्यात आले. सुनावणीअंती न्यायालयाने ७ आरोपींना दोषी ठरवले होते.
आरोपींची नावे आणि शिक्षेची तरतूद-
1) वरूण कुमार तिवारी
कलम ८ सी, २२ सी प्रमाणे - १० वर्ष सश्रम कारावास आणि 1 लाख रूपये दंड. दंड न भरल्यास अडीच वर्षाचा सश्रम कारावास. कलम 29 प्रमाणे - 10 वर्ष सश्रम कारावास आणि 1 लाख रूपये दंड. दंड न भरल्यास अडीच वर्षाचा सश्रम कारावास.
2) श्रीनिवास राव
कलम ८सी, २३ प्रमाणे - १२ वर्ष सश्रम कारावास, दीड लाख रूपये दंड. दंड न भरल्यास तीन वर्ष सश्रम कारावास. कलम 28 प्रमाणे - 12 वर्ष सश्रम कारावास, दीड लाख रूपये दंड. दंड न भरल्यास तीन वर्ष सश्रम कारावास.
3) विकास पुरी
कलम ८ सी, २२ सी प्रमाणे - १३ वर्ष सश्रम कारावास आणि १.७५ लाख रूपये दंड. दंड न भरल्यास तीन वर्षाचा सश्रम कारावास. कलम २७ अ प्रमाणे - १३ वर्ष सश्रम कारावास आणि १.७५ लाख रूपये दंड. दंड न भरल्यास तीन वर्षाचा सश्रम कारावास. कलम २९ प्रमाणे - १३ वर्ष सश्रम कारावास आणि १.७५ लाख रूपये दंड. दंड न भरल्यास तीन वर्षाचा सश्रम कारावास.
4) खेमा झोपे
कलम ८ सी, २२ सी प्रमाणे - १२ वर्ष सश्रम कारावास आणि दीड लाख रूपये दंड. दंड न भरल्यास तीन वर्षाचा सश्रम कारावास. कलम २९ प्रमाणे - १२ वर्ष सश्रम कारावास आणि दीड लाख रूपये दंड. दंड न भरल्यास तीन वर्षाचा सश्रम कारावास.
5) नितीन चिंचोले
कलम २५ प्रमाणे - १२ वर्ष सश्रम कारावास आणि दीड लाख रूपये दंड. दंड न भरल्यास तीन वर्षाचा सश्रम कारावास. कलम 29 प्रमाणे - १२ वर्ष सश्रम कारावास आणि दीड लाख रूपये दंड. दंड न भरल्यास तीन वर्षाचा सश्रम कारावास.
6) रजनीश ठाकूर
कमल ८ सी, २३ प्रमाणे - १२ वर्ष सश्रम कारावास आणि एक लाख ७५ हजार रूपये दंड. दंड न भरल्यास तीन वर्षाचा सश्रम कारावास. कलम २९ प्रमाणे - १२ वर्ष सश्रम कारावास आणि एक लाख ७५ हजार रूपये दंड. दंड न भरल्यास तीन वर्षाचा सश्रम कारावास.
7) एस.एम. सेन्थीलकुमार
कलम ८ सी, २३ प्रमाणे - ११ वर्ष सश्रम कारावास आणि दीड लाख रूपये दंड. दंड न भरल्यास अडीच वर्षाच सश्रम कारावास. कलम २९ प्रमाणे - ११ वर्ष सश्रम कारावास आणि दीड लाख रूपये दंड. दंड न भरल्यास अडीच वर्षाच सश्रम कारावास.