जळगाव - कोरोनाच्या भीतीखाली असलेल्या जळगावकरांसाठी सुखद बातमी आहे. जिल्ह्यातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाचा 14 दिवसांनंतर घेण्यात आलेल्या, पहिल्या वैद्यकीय चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. हा अहवाल आज दुपारी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला प्राप्त झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. एन. एस. चव्हाण यांनी दिली.
जळगाव शहरातील मेहरुण परिसरातील रहिवासी असलेल्या एका 49 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. कोरोनासदृश्य आजाराची लक्षणे दिसून येत असल्याने त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कोरोना संसर्ग विशेष कक्षात दाखल करण्यात आले होते. 28 मार्च रोजी रात्री त्याच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर या रुग्णावर कोरोना संसर्ग कक्षात उपचार सुरू होते.
उपचारादरम्यान 14 दिवसांनंतर त्याची पुन्हा पहिली वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. त्या चाचणीचा अहवाल आज दुपारी प्राप्त झाला असून तो निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
पहिल्या कोरोनाग्रस्त रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने सद्यस्थितीत जळगावात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही. यापूर्वी मेहरुणसह सालार नगरातील एका वृद्धाला कोरोनाची लागण झाली होती. त्यात सालार नगरातील वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, मेहरुणमधील व्यक्तीचा आता वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आला आहे.
या व्यक्तीची परदेशासह मुंबईतून जळगावी आल्याची ट्रॅव्हल्स हिस्ट्री होती. 12 एप्रिलपर्यंत प्रलंबित असलेल्या 36 पैकी 28 संशयित रुग्णांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 8 संशयित रुग्णांचे अहवाल अद्यापही प्राप्त झालेले नाहीत, असेही जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - 'ना नफा, ना तोटा' तत्त्वावर भरवला बाजार...पालकमंत्र्यांनी खरेदी केला भाजीपाला
हेही वाचा - जळगाव आरोग्य विभाग, सफाई कर्मचारीसाठी उपाययोजनांची कमतरता, पीपीई किटचा साठा संपला