जळगाव - जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी विशेष कक्ष उभारण्यात आला आहे. या कक्षात आतापर्यंत 10 संशयित रुग्ण दाखल झाले होते. त्यापैकी 8 जणांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीअंती निगेटीव्ह आले आहेत. एका रुग्णाच्या नमुन्याचा अहवाल अद्याप मिळालेला नाही. तर एकाचे नमुने पाठवलेले नाहीत. दरम्यान, राज्य शासनाच्या आदेशानुसार जळगावात सोमवारपासून शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत.
हेही वाचा... कोरोना कहर : मंत्रालयात आता 'जनता प्रवेशबंदी', कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी बंद
जिल्हा सामान्य रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 13 मध्ये कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी विशेष कक्ष उभारण्यात आला आहे. याठिकाणी आतापर्यंत 10 संशयित रुग्णांचे नमुने घेण्यात आले आहेत. सुदैवाने जळगावात आतापर्यंत कोरोनाचा एकही पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. त्याचप्रमाणे जे संशयित रुग्ण जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आलेले आहेत, ते सर्व जळगाव व्यतिरिक्त दुसऱ्या ठिकाणाहून शहरात आलेले आहेत. सोमवारी देखील 2 संशयित रुग्ण तपासणीसाठी आले होते. त्यांचे नमुने घेण्यात आले असून ते पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. राज्य शासनाच्या निर्देशानुसार कोरोनाच्या नियंत्रणासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
शाळा, महाविद्यालये, मॉल्स देखील बंद...
कोरोनाच्या नियंत्रणासाठी राज्य शासनाने दिलेल्या सुचनेनुसार जळगाव जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये, खासगी क्लासेस, मॉल्स तसेच गर्दीची ठिकाणे सोमवारपासून बंद करण्यात आली आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले आहेत. शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित व्यक्ती तसेच संस्थांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात म्हटले आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, घाबरून जाऊ नये, असेही आदेशात म्हटले आहे.
अन् विद्यार्थी परतले घरी...
राज्य शासनाच्या निर्देशानुसार सोमवारपासून राज्यातील शाळा तसेच महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. जळगाव जिल्ह्यात देखील या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र, सुटीसंदर्भात माहिती नसल्याने जळगावातील अनेक शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी नेहमीप्रमाणे पोहचले होते. परंतु, शिक्षकांनी माहिती दिल्यानंतर विद्यार्थी माघारी परतले. शिक्षक आणि प्राध्यापकांच्या उपस्थितीबाबत मात्र, कोणतेही स्पष्ट आदेश नसल्याने ते दैनंदिन कामकाजात सहभागी असल्याचे पाहायला मिळाले.