जळगाव - कोविड-१९ विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हवा प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी २५ डिसेंबर रोजी ख्रिसमस व नववर्ष स्वागत ३१ डिसेंबर या उत्सवांच्या कालावधीत जळगाव शहर महापालिका हद्दीत केवळ रात्री ८ ते रात्री १० या वेळेतच फटाके फोडण्यास परवानगी राहील, असे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहे.
नियम माेडले तर कारवाई होणार -
आदेशाचे काटेकोरपणे पालन हाेते की नाही याची तपासणी करण्याचे अधिकार पोलीस विभाग व जळगाव महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना प्रदान करण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास ही बाब भारतीय दंड संहिताचे कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहिल, असे आदेशात नमूद केले आहे. नियम माेडले तर थेट कारवाई केली जाणार आहे.
जिल्ह्यात ६ जानेवारीपर्यंत जमावबंदी कलम लागू -
जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात ६ जानेवारीपर्यंत मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ चे पोटकलम (१) व (३) जारी करण्यात आले आहे. या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस अधिक्षकांच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश लग्न मिरवणुका, अंत्ययात्रांना लागू राहणार नाही, असे अप्पर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - जळगाव: मक्तेदारांना वर्कऑर्डर मिळाल्या परंतु अमृत, भूमीगत गटारींच्या कामामुळे रखडली रस्त्यांची डागडुजी!
हेही वाचा - 'एक जिल्हा, एक कृषी उत्पादन' योजना अडकली लालफितीत; तीन महिने उलटूनही नाहीत मार्गदर्शक सूचना