जळगाव - कोरोनाबाधित रुग्णांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन जिल्हा रुग्णालयात 20 किलोलीटर क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे. औरंगाबाद येथील कंपनीने हा प्लांट दोन महिन्यांपूर्वीच उभारला आहे. मात्र, तो अद्यापही कार्यान्वित झालेला नाही. 'पेसो'च्या (पेट्रोलियम एक्सप्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन) प्रमाणपत्राअभावी प्लांट कार्यान्वित झालेला नाही. पेसोचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ठेकेदार प्रयत्न करत नसल्याने प्लांट कार्यान्वित होऊ शकलेला नाही. अनेकदा मुदत देऊनही दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदाराला अखेर जिल्हा रुग्णालय प्रशासनाने नोटीस बजावली आहे.
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आता आटोक्यात असून ऑक्सिजनची मागणी देखील घटली आहे. त्यानंतर ऑक्सिजन प्लांट उभारणीची प्रक्रिया झाली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोनाचे अवघे 311 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनाचा संसर्ग अधिक प्रमाणात असताना रुग्णसंख्या सातत्याने वाढत होती, अशा परिस्थितीत ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत होता. त्याचवेळी जर जलदगतीने कार्यवाही करून ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला असता तर रुग्णालय प्रशासनाचे कष्ट वाचले असते. मात्र, कोरोना नियंत्रणात असताना आता ऑक्सिजन प्लांट उभारला जात असल्याने तो भविष्यातील अडचणीतच कामी येणार आहे.
वाहतूक खर्च आणि कर्मचाऱ्यांचे परिश्रम वाचणार -
धुळे आणि कोल्हापूरच्या धर्तीवर जळगावातील जिल्हा कोविड रुग्णालयात 65 लाख रुपयांच्या निधीतून स्वतःचा लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे. या माध्यमातून ऑक्सिजन सिलिंडर वाहतुकीचा खर्च आणि कर्मचाऱ्यांचे परिश्रम वाचणार आहेत. लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारणीबाबत माहिती देताना अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद म्हणाले की, कोरोनाचा उद्रेक होण्यापूर्वी कोविड रुग्णालयात एका दिवसाला अवघ्या 150 ते 200 ऑक्सिजन सिलिंडरची गरज भासत होती. मात्र, मध्यंतरी हे रुग्णालय फक्त कोरोनाच्या रुग्णांसाठी राखीव होते. जिल्हाभरातून गंभीर अवस्थेतील रुग्ण याठिकाणी दाखल करण्यात येत होते. रुग्णालयातील सुमारे साडेचारशे बेड हे व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचे आहेत.
हेही वाचा - गुटखा विक्री प्रकरणी राज्य सरकार व पोलिसांना उच्च न्यायालयाची नोटीस
जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अचानकपणे वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण पडला होता. त्यामुळे कोविड रुग्णालयात एका दिवसाला प्रत्येकी 7 हजार क्षमतेचे 1200 ते 1400 जम्बो ऑक्सिजन सिलिंडर लागत होते. रुग्णसंख्या सातत्याने वाढतच असल्याने ऑक्सिजन सिलिंडरची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता भासत होती. त्यामुळे पुरवठादाराकडून ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा वेळेत होत नव्हता. सिलिंडरची मागणी व पुरवठा यात अटीतटीची स्थिती निर्माण होत असल्याने त्यावर सातत्याने उपाययोजना कराव्या लागत होत्या. यावर उपाय म्हणून रुग्णालयातच लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे डॉ. रामानंद यांनी सांगितले.
ऑक्सिजन पाईपलाईनचे कामही पूर्ण -
राज्यात कोरोनाचा उद्रेक वाढल्यानंतर सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यावर उपाय म्हणून राज्य सरकारने 100 किंवा त्यापेक्षा अधिक बेड्स असलेल्या रुग्णालयात स्वतःचा लिक्विड ऑक्सिजन प्लांट असणे बंधनकारक केले आहे. याच अनुषंगाने धुळे आणि कोल्हापूर याठिकाणी लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले आहेत. या दोन्ही जिल्ह्यांच्या धर्तीवर जळगावातही लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे. प्रत्येक वॉर्डातील बेड्सला ऑक्सिजन पाईपलाईन जोडण्याचे कामही पूर्ण झाले आहे. आता लिक्विड ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित होण्याची प्रतीक्षा आहे.
20 किलोलीटर क्षमतेचा आहे प्लांट -
जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या बाजूस मोकळ्या जागेत उभारण्यात आलेला लिक्विड ऑक्सिजन प्लांट हा 20 किलोलीटर क्षमतेचा आहे. त्यात एकाच वेळी सुमारे अडीच हजार जम्बो सिलिंडर ऑक्सिजनची निर्मिती होईल. एका जम्बो सिलिंडरमध्ये सुमारे 7 हजार लीटर ऑक्सिजन असतो. प्लांट उभारून दोन महिने उलटले आहेत. मात्र, तो अद्यापही कार्यान्वित झालेला नाही, अशा परिस्थितीत लाखो रुपयांचा निधी सत्कारणी लागलेला नाही.