जळगाव - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक येथील विशेष पथकाने २ मे रोजी एकाचवेळी ६ वाईन शॉप्सवर छापे मारुन तपासणी केली. या तपासणीत एका दुकानात मुदत संपलेला मद्यसाठा मिळून आला. तर एका गोदामात १५८ बाटल्यांची तफावत आढळून आली आहे. या कारवाईमुळे वाईन शॉप चालकांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, जळगावचे भाजप आमदार सुरेश भोळे यांच्या मुलाच्या नावावर असलेल्या एका दारूच्या गोदामात दारूच्या साठ्यात झोल झाल्याचा संशय असल्याने आमदार पुत्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या रडारवर आहे.
जळगाव शहरातील गुजराल पेट्रोल पंपाजवळील एन. एन. वाईन या दुकानात मुदत संपलेला (कालबाह्य) बिअरचा साठा आढळून आला आहे. तर आमदार सुरेश भोळे यांच्या मुलाच्या नावावर असलेल्या नशिराबाद येथील रामा ट्रेडर्स येथे १८० मिलीच्या १४९ व ७५० मिलीच्या ९ अशा एकूण १५८ बाटल्यांची तफावत आढळून आली. आमदार भोळे यांच्या मुलाच्या नावावर असलेल्या या गोदामात तफावत आढळून आल्यामुळे आता आमदार पुत्र चौकशीच्या फेऱ्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी नवी पेठेतील नीलम वाईन्स, नशिराबाद येथील रामा ट्रेडर्स, विजय सेल्स, गुजराल पेट्रोल पंपाजवळील एन. एन. वाईन्स, बांभोरी येथील विनोद वाईन्स व पाळधी येथील सोनी ट्रेडर्स या ६ दुकानांची एकाच वेळी तपासणी सुरू केली होती. विजय सेल्समध्ये ३ दिवसाच्या नोंदी नव्हत्या. तसेच विदेशी, देशी व बिअरच्या साठ्यात तफावत आढळून आली. नीलम वाईन्समध्ये २१ मार्चची नोंद नव्हती. तसेच मद्यसाठ्यातही तफावत आढळून आली. बांभोरी येथील विनोद वाईन्समध्येही ३ दिवसाच्या नोंदी अपूर्ण व विदेशी मद्यसाठ्यात तफावत आढळली.
तपासणी करण्यात आलेल्या सर्व ६ दुकानांमध्ये दारूच्या साठ्यात तफावत व रेकॉर्ड अद्ययावत नाही, त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने संबंधित वाईन शॉप, गोदाम मालकांवर विभागीय गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाने लॉक डाउनच्या काळात बेकायदेशीरपणे दारू विक्रीच्या अनुषंगाने चौकशीला सुरुवात केली आहे. त्यामुळे जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.