जळगाव - कृषी उत्पन्न बाजार समिती महासंघाच्या आदेशाने शुक्रवारी पुकारण्यात आलेल्या एकदिवसीय लाक्षणिक संपामुळे जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत लाखोंचे व्यवहार ठप्प झाले. केंद्र सरकारने ५ जुन २०२० ला काढलेल्या बाजार समिती नियमन मुक्ती आदेशाविराेधात कृषी उत्पन्न बाजार समिती महासंघाने एक दिवसाच्या लाक्षणिक संपाची हाक दिली होती. या संपात जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसह जिल्ह्यातील सर्वच बाजार समितींचा सहभाग होता.
केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्या नियमनमुक्त झालेल्या आहेत. त्यामुळे शेतकरी बाजार समित्यांच्या बाहेर देशात काेठेही त्यांचा शेतमाल विक्री करू शकताे. दरम्यान, या निर्णयामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांना बाजार समितीच्या बाहेर झालेल्या शेतमाल खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून मार्केट फी मिळणार नाही. बाजार समितीमध्ये शेतकरी, व्यापारी, अडते, हमाल-मापाडी या सर्वांवर समितीचे नियंत्रण असल्याने शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी याेग्य भाव, पैसे मिळण्याची हमी मिळत असते. तसेच शेतकऱ्यांना अनेक सुविधा दिल्या जातात.
हेही वाचा - श्रीशैलमच्या विद्युत घरात मोठी आग; तिघांचा मृत्यू, आणखी सहा अडकले
बाजार समितीबाहेरचे व्यवहार शेतकऱ्यांसाठी तेवढे सुरक्षित राहणार नसल्याने बाजार समितींवरील नियमन मुक्तीचा निर्णय शेतकऱ्यांसाठी देखील याेग्य नसल्याचे बाजार समिती महासंघाचे म्हणणे आहे. राज्य बाजार समिती सहकारी संघ ही राज्यातील सर्व बाजार समित्यांची एकत्रित नाेंदणीकृत संस्था आहे. याच संस्थेच्या माध्यमातून शुक्रवारी राज्यभरात एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला होता. राज्यातील ३०७ पैकी ३०१ बाजार समित्या या संघाच्या सदस्या आहेत.
संपामुळे जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील यार्डात शुक्रवारी सकाळी ५ वाजेपासून कोणतेही व्यवहार झाले नाहीत. या संपाची पूर्वकल्पना देण्यात आलेली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्रीसाठी आणला नाही. बाजार समितीच्या आवारातील सर्व व्यवहार ठप्प असल्याने शुकशुकाट जाणवत होता. आडते, व्यापारी यांची दुकाने देखील बंद होती.