जळगाव - उन्हाचा तडाखा वाढल्याने वन्यप्राण्यांना पाण्यासाठी जंगलात वणवण भटकंती करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर जळगावातील साई सुवर्ण संस्थेने भूतदया जपत जामनेर तालुक्यातील वनक्षेत्रात ठिकठिकाणी जंगलातील पाणवठ्यांमध्ये पाण्याची व्यवस्था केली आहे. संस्थेच्या कनवाळूपणाबद्दल वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आभार व्यक्त केले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील कुंभारी वनक्षेत्रात वन विभागाने ठिकठिकाणी वन्यप्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठे तयार केलेले आहेत. अलीकडे उन्हाचा तडाखा वाढत असल्याने वन्यप्राणी पाण्यासाठी वणवण भटकंती करत आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्था ठप्प असल्याने जंगलातील पाणवठ्यांमध्ये पाणी टाकण्यात अडचणी येत आहेत. ही बाब वनरक्षक समाधान धनवट, आर. बी भदाणे व पिंजारी यांनी साई सुवर्ण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा प्राणी मित्र प्रभाकर साळवे यांना सांगितली. त्यानुसार साळवेंनी वन्य प्राण्यांना पाणी पुरवण्याची जबाबदारी स्वीकारली. प्रभाकर साळवे यांनी तात्काळ आपल्या मालवाहू बोलेरो गाडीत टँकर बसवले. या टँकरच्या माध्यमातून पाणवठ्यांमध्ये पाणी टाकले जात आहे. पावसाळ्यापर्यंत नियमितपणे अशा रितीने पाणी पुरवठा होणार आहे.
कुंभारी वनक्षेत्रात नीलगाय, हरीण, चिंकारा, काळवीट, ससे, रानडुक्कर असे प्राणी मोठ्या संख्येने आहेत. वन विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या कृत्रिम पाणवठ्यांमुळे त्यांची पाण्याची सोय होणार आहे. दरम्यान, काही पाणवठ्यांची डागडुजी करण्यात आली असून, त्यांच्यातही पाणी टाकले जाणार आहे.