जळगाव - महापालिकेने गाळेधारकांना बजावलेली बिले अवाजवी असल्याने लाखाे रूपये भरणे शक्य हाेणार नाही. प्रशासनाने साेमवारपासून गाळे सिल करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या निर्णयाची प्रतिक्षा देखिल करायला तयार नाही. गाळेधारकांवर माेठे संकट उभे राहणार असल्याने शुक्रवारपासून ( दि. ५ मार्च) चाैदा व्यापारी संकुलातील सर्व गाळे बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय संघटनेचे अध्यक्ष डाॅ. शांताराम साेनवणे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला.
हेही वाचा - ताजमहालात स्फोटके आढळली नाहीत; अफवा असल्याचे स्पष्ट
महापालिका प्रशासनाने व्यापारी संकुलांमधील गाळेधारकांना थकीत रकमा भरण्याचा अल्टीमेटम दिला आहे. अन्यथा साेमवारपासून गाळेधारकांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभुमीवर गाळेधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची दुपारी पत्रकार परिषद झाली. यावेळी पांडुरंग काळे, राजस काेतवाल, युवराज वाघ, तेजस देपुरा, पंकज माेमाया, विलास सांगाेरे, राजेश पिंगळे, रिजवान जहागीरदार आदी उपस्थित हाेते.
गाळेधारकांच्या भाड्यात दुप्पट वाढ करावी-
राज्यातील २७ महापालिका क्षेत्रात गाळ्यांचा प्रश्न तिव्र आहे. परंतु जळगावची एकमेव पालिका गाळेधारकंसाेबत क्रुरपध्दतीने वागत आहे. महापालिकेने गाळेधारकांच्या भाड्यात दुप्पट वाढ करावी अशी मागणी करत पैसे भरताे आणि चाव्या प्रशासनाच्या हातात देण्याची तयारी असल्याचे डाॅ. साेनवणे यांनी सांगीतले.
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांच्या बाबरी मशीद विद्ध्वंस समर्थनामुळे घटक पक्ष नाराज; शरद पवारांना लिहिणार पत्र
२३ संकुलांची मुदत संपली-
महापालिकेच्या मालकीच्या २३ संकुलांची मुदत संपली असली तरी १४ व्यापारी संकुल हे अव्यावसायीक दर्जाची आहेत. या ठिकाणी व्यवसाय करणारे गाळेधारक अत्यंत गरीब आहेत. त्यांची बिले कमी करून द्यावी अथवा निर्लेखित करावी अशी मागणी केली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा झाली असून नगरविकास मंत्र्यांसाेबत बैठक आयाेजीत करण्यात येणार असल्याचे सांगीतले.
कुटुंबियांसह रस्त्यावर उतरणार-
प्रशासन गाळेधारकांचा काेणताही विचार करत नसल्याने चाैबे मार्केट, भाेईटे मार्केट, जुने बी.जे.मार्केट, डाॅ. आंबेडकर मार्केट, वालेच मार्केट, छत्रपती शाहु महाराज मार्केट, शिवाजीनगर मार्केट, भास्कर मार्केट, महात्मा गांधी मार्केट, निर्मलाबाई लाठी शाळा इमारत, शामा प्रसाद मुखर्जी मार्केट,, नानीबाई अग्रवाल मार्केट, जुने शाहु मार्केट, धर्मशाळा मार्केट, गेंदालाल मिल काॅम्प्लेक्स या चाैदा मार्केटमधील गाळेधारक शुक्रवारपासून बेमुदत दुकाने बंद ठेवणार आहेत. गरज भासल्यास कुटुंबियांसह रस्त्यावर उतरण्याची तयारी आहे. काेराेना काळात काही विपरीत घडल्यास त्याला प्रशासन जबाबदार असेल असा इशारा दिला आहे.