जळगाव - कोरोनाचे संकट कमी होत असतानाच, आता राज्यावर कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचे नवे संकट उभे राहिले आहे. जळगाव जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे 7 रुग्ण आढळून आल्याने खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारच्या निर्देशानुसार पुन्हा निर्बंध लागू केले आहेत. यात अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त सेवांना आता दुपारी 4 वाजेपर्यंतच मुभा असेल. येत्या रविवारपासून (दि. 27 जून) या निर्बंधांची अंमलबजावणी होणार आहे.
शनिवारी व रविवारी विकेंड लॉकडाऊन
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शुक्रवारी (दि. 25 जून) रात्री याबाबतचे आदेश जारी केले. जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंधांबाबत जारी केलेल्या नव्या आदेशानुसार जळगाव जिल्ह्यात आता यापुढे नॉन इसेन्सियल म्हणजेच अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त सेवांसाठी सोमवार ते शुक्रवार दरम्यान दुपारी 4 वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. प्रत्येक आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शनिवारी आणि रविवारी विकेंड टाळेबंदी असेल. या काळात नॉन इसेन्सियल सेवा पूर्णपणे बंद असतील. अत्यावश्यक सेवांमध्ये मेडिकल दुकाने व वैद्यकीय सेवा वगळता इतर दुकाने देखील 4 वाजेपर्यंत सुरू असतील.
सायंकाळी 5 नंतर बाहेर फिरण्यास मनाई
नव्या आदेशानुसार जिल्ह्यात सायंकाळी 5 वाजेनंतर सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी असेल. कोणत्याही व्यक्तीस वैद्यकीय गरज वगळता मुक्तपणे फिरण्यास मनाई घालण्यात आली आहे. दररोज सायंकाळी 5 वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी एका वेळेस 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई केली आहे.
अशा प्रकारे असतील निर्बंध
- अत्यावश्यक सेवा (दररोज दुपारी 4 वाजेपर्यंत, मेडिकल दुकाने व वैद्यकीय सेवा वगळून, सर्व दुकानदारांनी आपल्या दुकानात 5 पेक्षा अधिक ग्राहकांना प्रवेश देऊ नये, दुकानाच्या दर्शनी भागात काच किंवा पारदर्शक शीट लावावी, सॅनिटायझेशनची व्यवस्था करावी)
- अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने व आस्थापना (सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत, शनिवारी व रविवारी पूर्णपणे बंद)
- शॉपिंग मॉल, थिएटर्स, नाट्यगृह, सिंगल स्क्रिन मल्टिप्लेक्स (पूर्णपणे बंद)
- हॉटेल, रेस्टॉरंट व बार (50 टक्के ग्राहक क्षमतेसह सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 पर्यंत डायनिंग सुरू, दुपारी 4 ते रात्री 9 पर्यंत केवळ पार्सल सेवा, शनिवारी व रविवारी डायनिंग पूर्णपणे बंद व केवळ पार्सल सेवा)
- सार्वजनिक ठिकाणे, मॉर्निंग वॉक, सायकलिंग (दररोज सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत सुरू)
- खासगी कार्यालये (सुरू, 50 टक्के क्षमतेसह दुपारी 4 वाजेपर्यंत, फक्त वर्किंग डेसाठी)
- शासकीय कार्यालये (नियमित वेळ, कर्मचारी उपस्थिती 50 टक्के)
- आंतरजिल्हा प्रवास (सुरू, लेव्हल 5 मध्ये समावेश असणाऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी पोलिसांकडून ई-पास आवश्यक)
- क्रीडा प्रकार, तत्सम स्पर्धा (दररोज सकाळी 5 ते 9 दरम्यान सुरू, आऊटडोअर स्पोर्ट्स ओन्ली)
- जिम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा तसेच वेलनेस सेंटर्स (50 टक्के ग्राहक क्षमतेसह, दुपारी 4 वाजेपर्यंत, एसी वापरण्यास मनाई)
- सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम (50 टक्के क्षमतेसह 2 तासांच्या आत, सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत)
- लग्न समारंभ (सुरू, एकाचवेळी 50 लोकांच्या उपस्थितीत, दुपारी 4 वाजेपर्यंत)
- अंत्यविधी (केवळ 20 लोकांच्या उपस्थितीत)
- सर्व बैठका, ग्रामपंचायत व को ऑपरेटिव्ह निवडणुका (50 टक्के क्षमतेसह)
- सर्व बांधकामे (दुपारी 4 वाजेपर्यंत)
- कृषी संबंधित कामे (दुपारी 4 वाजेपर्यंत)
- इ कॉमर्स सेवा (दररोज सुरू)
- सार्वजनिक वाहतूक (100 टक्के क्षमतेसह सुरू)
- मालवाहतूक (सुरू, केवळ 3 व्यक्तींकरिता)
- शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस तसेच शैक्षणिक प्रशिक्षण संस्था (बंद, ऑनलाइन व दूरस्थ प्रणालीने सुरू)
हेही वाचा - Gold Rate : सोनं झालं स्वस्त, वाचा आजचा दर