जळगाव - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने आज ठाकरे सरकारच्या विरोधात राज्यव्यापी 'महाराष्ट्र बचाव आंदोलना'ची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनात भाजपचे सर्वच नेते, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. जळगाव जिल्ह्यात मात्र, भाजपच्या या आंदोलनापेक्षा एकनाथ खडसे यांची चर्चा आहे. त्याला कारणही तसेच आहे. सोशल मीडियावर एकनाथ खडसेंच्या हाती 'फडणवीस हटाओ, महाराष्ट्र बचाओ' असा मजकूर असलेल्या बॅनरचा फोटो जोरदार व्हायरल झाला आहे.
विधानपरिषद निवडणुकीत संधी न मिळाल्याने सध्या खडसे भाजपच्या पक्षश्रेष्ठींवर नाराज आहेत. त्यामुळे खडसेंनी खरोखर अशी भूमिका घेतली की काय? याची चर्चा आहे. परंतु, हा फोटो कुणीतरी एडिटिंग करून व्हायरल केल्याचे स्पष्टीकरण खडसेंनी स्वतः 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिले.
महाविकास आघाडीविरोधात घोषणाबाजी-
एकीकडे भाजपच्या नेत्यांनी ठाकरे सरकारविरोधात एल्गार पुकारला असताना, तिकडे नाराज नेते एकनाथ खडसे नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागले होते. खडसे भाजपच्या आंदोलनात उतरणार की नाही, याची उत्सुकता होती. अखेर एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरात आपल्या घरासमोर अंगणात उतरुन, महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
एकनाथ खडसे यांनी त्यांच्या मुक्ताईनगरातील कोथळी गावातील घरासमोर आंदोलन केले. या आंदोलनावेळी खडसेंनी ठाकरे सरकारवर टीका करणारा मजकूर असलेले बॅनर हाती घेतले होते. हे आंदोलन झाल्यानंतर त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. कुणीतरी अज्ञात व्यक्तीने खडसेंच्या हाती असलेल्या बॅनरचा एक फोटो एडिट करून त्यावर 'फडणवीस हटाओ, महाराष्ट्र बचाओ' असा मजकूर टाकला. त्यानंतर तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला.
खडसेंच्या बाबतीत भाजपकडून सुरू असलेल्या अन्यायाच्या विषयावर या प्रकारामुळे अधिक चर्चा सुरू झाली. जळगावातील अनेक राजकीय ग्रुपवर हा फोटो व्हायरल झाला. अनेक जण एकमेकांना याबाबत विचारणा करत होते. दरम्यान, या प्रकारसंदर्भात एकनाथ खडसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण असा कोणताही प्रकार केलेला नसल्याचे स्पष्ट केले. कुणीतरी अज्ञात व्यक्तीने हा खोडसाळपणा केला असून आम्ही स्वतः त्याचा शोध घेत आहोत, असेही खडसे सांगितले.
हेही वाचा - 'भाजपने कोरोनाबाबत राजकारण करण्यापेक्षा खडसेंना 'क्वारंटाईन' का केलं, याचं उत्तर द्यावं'
हेही वाचा - चिंता वाढली; जळगाव जिल्ह्यात एकाच दिवशी आढळले 30 कोरोना रुग्ण