जळगाव - शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल ससे यांनी २६ एप्रिल रोजी रात्री गस्तीवर असताना पकडलेल्या मद्यसाठ्याची पाळेमुळे शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हा मद्यसाठा जळगाव महापालिकेच्या एका माजी नगरसेविकेच्या नावावर असलेल्या हॉटेलमधून तस्करीसाठी अवैधरित्या बाहेर काढण्यात आला होता. मात्र, विल्हेवाट लागण्यापूर्वीच हा मद्यसाठा पोलिसांनी पकडला होता.
शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल ससे यांना २५ एप्रिल रोजी रात्री शहर विभागात (डिव्हीजन) नाईट राऊंड होता. यावेळी पहाटे साडेतीन वाजता ससे यांचे वाहन नेरीनाका परिसरात आल्यानंतर (एमएच १९ एएक्स ६६०८) या क्रमांकाची कार संशयितपणे फिरत असताना ससे यांनी पकडली होती. यावेळी कारचालक कार सोडून पसार झाला होता. या कारमधून ८८ हजार ३०० रुपयांच्या विविध देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या मिळून आल्या होत्या. ३ दिवसानंतर पोलिसांनी या मद्यसाठ्याची पाळेमुळे शोधून काढली. हा मद्यसाठा प्रभात चौकातील हॉटेल 'पांचाली'मधून बेकायदेशीरपणे विक्री करण्यासाठी काढण्यात आला हाेता. या प्रकरणात हॉटेलचा मॅनेजर हर्षल राजेंद्र बारी (वय २४, रा.काशिनाथनगर) व संदीप अरविंद पाटील (वय २५, रा. चंदुअण्णानगर) या दोघांना २८ एप्रिल रोजी रात्री पोलिसांनी अटक केली आहे. हॉटेल पांचाली हे माजी नगरसेविका तथा महिला व बालकल्याण सभापती भारती जाधव यांच्या नावावर असल्याचे तपासात समोर आले आहे.
कारवाईनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने हॉटेल पांचाली व पोलिसांनी पकडलेला मद्यसाठा तपासला. बॅच नंबरवरुन मद्यसाठ्याची ओळख पटवण्यात आली आहे. त्यानुसार राज्य उत्पादन विभागाकडून विभागीय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच हॉटेल पांचाली देखील सील करण्यात आली आहे. भारती जाधव यांच्या नावावर असलेली ही हॉटेल आर. के. वाईनचा मालक दिनेश नोतवानी याने चालवण्यासाठी घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मद्यतस्करीत राजकीय लोकांचा सहभाग समोर आला आहे.