जळगाव - भाजप नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याचा वावड्या गेल्या अनेक दिवसांपासून उठू लागल्या आहेत. इतकेच नाही तर त्यांनी आज भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याची माहितीही पुढे आली होती. मात्र, मी भाजपामधील कोणत्याही पदाचा राजीनामा दिला नसल्याचे स्पष्टीकरण स्वत: एकनाथ खडसे यांनी केले आहे. या संदर्भात एएनआयने माहिती दिली आहे. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील नाथाभाऊंनी पक्षाचा राजीनामा दिला नाही. नाथाभाऊ पक्षाचा राजीनामा देणार नाहीत, असे म्हटले आहे.
एकनाथ खडसे यांनी आपल्या भाजप सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिल्याची माहिती समोर आली होती. तसेच ते येत्या गुरुवारी (22 ऑक्टोबर) राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहितीही चर्चेत होती. मात्र, यावर स्वत: एकनाथ खडसे यांनी मी राजीनामा दिला नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. यापूर्वीही एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याबाबत अनेक मुहूर्त सांगण्यात आले. मात्र, हे मुहूर्त आपण दिले नसल्याचे सांगून खडसे यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला होता.