जळगाव - जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये होलिकोत्सवाची धूम सुरू आहे. यावल, रावेर तालुक्यातील विविध पाडे, वाड्या आणि वस्त्यांवर वास्तव्यास असलेल्या भटक्या आदिवासी समुदायात होळीचा सण मोठ्या हर्षोल्हासात साजरा केला जातो. आदिवासी बांधवांच्या होळी सणाचे प्रमुख आकर्षण म्हणजे 'भोंगऱ्या बाजार'. या भोंगऱ्या बाजारात खऱ्या अर्थाने आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडते. यावर्षी देखील ठिकठिकाणी भोंगऱ्या बाजार भरविण्यात आला आहे.
सातपुड्यात वास्तव्यास असलेल्या आदिवासी संस्कृतीत होलिकोत्सवाला फार महत्त्व आहे. होलिकोत्सवानिमित्त जागोजागी भरणारा भोंगऱ्या बाजार म्हणजे आदिवासी संस्कृतीची खरी ओळख आहे. भोंगऱ्या बाजार आदिवासी बांधवांसाठी पर्वणीच असतो. फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होलिकोत्सव साजरा होतो. गायीच्या शेणाच्या गोवऱ्या, सरपण रचून होळी सजवली जाते. नंतर होळीचे विधिवत पूजन करून अग्निसंस्कार होतो. त्यास गोडधोड अन्नपदार्थांचा नैवेद्यही दाखवला जातो. पूजेसाठी जमलेला समुदाय होळीला प्रदक्षिणा घालतो. आदिवासी बांधव महाकाय ढोल वाद्यावर ठेका धरतात. आदिवासी परंपरेतील सदाबहार नृत्य व गाण्यांचे यावेळी सादरीकरण होते.
हेही वाचा - 'अलग ये मेरा रंग है', अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याला तासाभरातच मिळाले मिलियन व्हिव्ज
दुसऱ्या दिवशी विविध रंगांची उधळण करीत रंगपंचमी साजरी केली जाते. फाल्गुन शुद्ध होळी पौर्णिमेच्या काळात आदिवासी भागात भोंगर्या बाजार भरतो. या बाजारात आदिवासी बांधवांचे कपडे, अलंकार, विविध खाद्यपदार्थ तसेच संसारोपयोगी वस्तू विक्रीची दुकाने थाटलेली असतात. हा बाजार होळीच्या सणाचा आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो.
हेही वाचा - जागतिक महिला दिन : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे टि्वटर खाते सांभाळतायत 'या' 7 महिला