जळगाव - जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. भारतातही आता कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पाहायला मिळत आहे. होळी आणि धुळवडीच्या सणावर देखील कोरोनाचे सावट आहे. मात्र, जळगावात कोरोनाची भीती दूर सावरत धुळवड जल्लोषात साजरी झाली. शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी तरुणाई धुळवड साजरी करण्यासाठी हिरीरीने बाहेर पडली होती. सप्तरंगांची मुक्त उधळण करत तरुणाईने धुळवड साजरी केली.
हेही वाचा - जळगावात स्वच्छतेचा उडाला बोजवारा; पालिका मक्तेदारावर मेहेरबान
जळगाव शहरातील विविध कॉलन्या तसेच उपनगरांमध्ये सकाळपासूनच धुळवडीचा उत्साह पाहायला मिळाला. आबालवृद्धांसह सारेच धुळवडीचा आनंद लुटण्यासाठी घराबाहेर पडले होते. ठिक-ठिकाणी गाण्यांच्या तालावर तरुणाई थिरकत होती. एकमेकांना रंग लावून धुळवड साजरी झाली. शहरातील विविध लॉन्स, मंगल कार्यालयांमध्येही धुळवड साजरी करण्यासाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वत्र कोरोना व्हायरसची भीती आहे. मात्र, जळगावात कुठेही कोरोनाचा प्रभाव दिसून आला नाही. कोरोनाच्या भीतीला दूर सावरत विविध शाळा तसेच महाविद्यालयांमध्येही धुळवडीचा जल्लोष पाहायला मिळाला. यावर्षी पावसाळा चांगला होता. त्यामुळे पाण्याची समस्या नाही. पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने धुळवडीचा आनंद द्विगुणित झाला होता.
हेही वाचा - सोने-चांदीच्या भावात चढउतार, लग्नसराईत सराफा बाजारावर मंदीचे सावट