जळगाव - तापी नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आल्याने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे. महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात दमदार पाऊस होत असल्याने, तापी नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. तापी नदीवरील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील दमदार पाऊस झाल्याने, या धरणाचे 32 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत. सद्यस्थितीत हतनूर धरणातून 2 हजार 395 क्यूसेक इतका विसर्ग तापी नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे.
राज्यासह मध्यप्रदेशात गेल्या काही दिवसांपासून दमदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे पाण्याची सातत्याने आवक होत असल्याने, तापी नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. पुढील 72 तासांपर्यंत तापी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ नोंदविण्यात येणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील हतनूर येथे हतनूर धरणाचे 32 दरवाजे रविवारी सकाळी पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले. धरणातून सध्या 2 हजार 395 क्यूमेक म्हणजेच 84 हजार 591क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग तापी नदीच्या पात्रात सोडण्यात आलेला आहे.
हेही वाचा - राज्यातील कृषी खातं झोपलंय की काय? राज्यमंत्री बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
यामुळे तापी नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आला असून, नदी दुथडी भरून वाहत आहे. जळगाव जिल्ह्यातून पुढे धुळे व नंदुरबार जिल्ह्यात वाहत असताना तापी नदीला पूर आला असून, नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. खबरदारी म्हणून नदीकाठी असलेल्या गावातील नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे, आपली गुरे देखील नदीपात्रात नेऊ नये, असे आवाहन तापी पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, तापी नदीवरील हतनूर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पुढे तापी नदीवरील सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजचे देखील दरवाजे उघडण्यात आले आहेत. प्रकाशा बॅरेजच्या 4 दरवाजांमधून 69 हजार 442 क्युसेक तर सारंगखेडा बॅरेजच्या 4 दरवाजांमधून 62 हजार 408 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
हेही वाचा - तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ; ऋषीपंचमीनिमित्त महिलांना नदीकाठावर जाण्यास मनाई