जळगाव - शहरातील अस्वच्छतेच्या कारणावरून महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांची विभागातून उचलबांगडी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी डॉ. पाटील यांच्या बदलीचे आदेश काढले.
वारंवार साफसफाईचे काम ठप्प होणे, रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचणे, घंटागाडी आणि सफाई कामगारांचा संप आदी कारणांमुळे मनपा व आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत रोष निर्माण झाला आहे. वॉटर ग्रेसने काम बंद केल्याने पालिकेने पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याचा केलेला दावा फोल ठरला. दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी उपायुक्त मिनिनाथ दंडवते आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. आरोग्याच्या विषयावर या बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर डॉ. ढाकणे यांनी थेट आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत.
हेही वाचा - 'तुम्ही कृतघ्न आहात..! शरद पवार तर स्वत: बाप झालेत'
तर डॉ. पाटील यांच्याकडे जन्म मृत्यू विभागाचे कामकाज कायम ठेवले आहे. त्यांची सेवा दवाखाने विभागात वर्ग केली आहे. अडीच महिन्यांपूर्वीच त्यांच्या बदलीचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवण्यात आला होता. त्यात उपायुक्त व आरोग्य अधिकाऱ्यांत गेल्या काही महिन्यांपासून शीतयुद्ध सुरू आहे. डॉ. विकास पाटील यांचा तिसऱ्यांदा पदभार काढला. आरोग्याधिकारी पदाचा कार्यभार आता सहायक आयुक्त पवन पाटील यांच्याकडे सोपवला आहे. पवन पाटील यांच्याकडे घनकचरा व्यवस्थापन या पदाचा कार्यभार आहे. डॉ. पाटील यांचा तिसऱ्यांदा पदभार काढला आहे.