जळगाव - अज्ञात हॅकरने पैसे मिळविण्यासाठी एक अजब पद्धत वापरल्याचे समोर आले. अज्ञात हॅकर्सनी आर. सी. बाफना ज्वेलर्सच्या 80 संगणकांमधून महत्त्वपूर्ण डेटा 24 नोव्हेंबर रोजी चोरी केला. इनस्क्रिप्ट झालेला डेटा परत देण्यासाठी हॅकरने सुमारे 60 लाख रुपयांची मागणी केली.
आर. सी. बाफना ज्वेलर्स ही सुवर्णपेढी जळगाव जिल्ह्यातील सराफ बाजारातील नामांकित सुवर्णपेढी आहे. 24 नोव्हेंबर रोजी या पेढीतील अकाउंट्स, बिलिंग, कस्टमर डिटेल्स विभागातील एकूण 80 संगणकांची सॉफ्टवेअर प्रणाली अचानक काही काळासाठी बंद पडली. त्यानंतर संगणक प्रणाली सुरू झाल्यावर त्यातील डाटा लॉक होऊन चोरीस गेल्याचे निदर्शनाला आले. इनस्क्रिप्ट झालेल्या डेटामध्ये एक नोटपॅड फाईल हॅकर्सनी पाठवली होती. त्या फाईलमध्ये इनस्क्रिप्ट झालेला डेटा परत देण्यासाठी प्रति संगणक 980 डॉलर अशी सुमारे 60 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. संबंधित हॅकरने संपर्कासाठी त्यांचा एक ई-मेल आयडी देऊन 72 तासांच्या आत रिप्लाय मागितला होता.
हेही वाचा-रायगड संवर्धनासाठी २० कोटी निधी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय
संगणक प्रणाली हॅक झाल्याचे लक्षात येताच बाफना ज्वेलर्सचे संचालक सिद्धार्थ बाफना यांनी सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदवली. सायबर गुन्हे शाखेकडून आय.पी. अॅड्रेसवरून संबंधित हॅकर्सनी माहिती मिळवली जात आहे. नायजेरियन टोळीने हा प्रकार केल्याचा संशय असून पोलीस तपास सुरू आहे.
हेही वाचा-अजबच.. 127 रुपयांची दिली जेवणाची ऑनलाईन ऑर्डर अन् गमावून बसला 49 हजार रुपये
सुदैवाने सर्व डेटा सुरक्षित-
आर. सी. बाफना ज्वेलर्सने साताऱ्याच्या एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनीकडून संगणक प्रणाली विकसित करून घेतली आहे. त्यानुसार दैनंदिन डेटा थर्ड पार्टी सॉफ्टवेअरमध्ये बॅकअॅप केला जातो. त्यामुळे हॅकरने संगणक प्रणालीतील डेटा हॅक केला तरी तो सुरक्षित राहिला आहे.