जळगाव - जिल्ह्यात केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण जळगाव जिल्ह्यात केळी संशोधन विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. जळगावातील केळी संशोधन केंद्राच्या वतीने केळी उत्पादक शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्यासाठी मंच सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला गुलाबराव पाटील यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी ते बोलत होते.
केळी उत्पादक शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्यात केळीशी निगडित विविध विषयांवर सखोल चर्चा व्हावी, या उद्देशाने मंच सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी तसेच शास्त्रज्ञ उपस्थित होते. सभेपूर्वी गुलाबराव पाटील यांनी जळगाव केळी संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या वाणाच्या केळी बागेची पाहणी केली. त्यांना केळी संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी केळी विषयी सविस्तर माहिती दिली.
गुलाबराव पाटील म्हणाले की, 'जळगाव जिल्ह्यातील केळी सातासमुद्रापार प्रसिद्ध आहे. केळीबाबत अजून संशोधन होण्याची गरज आहे. हे संशोधन झाले तर शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न कसे घेता येईल, याचे मार्गदर्शन होईल. त्यामुळे जिल्ह्यात केळी संशोधन विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. या कामी केळी संशोधन केंद्राने अधिवेशनपूर्वीच तसा सविस्तर प्रस्ताव तयार करावा. हा प्रस्ताव मी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे सादर करून त्याला मंजुरी घेऊन येईन. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यास मदत होईल.'
केळी उत्पादक शेतकरी आणि शास्त्रज्ञांनी या कामी मला सहकार्य करावे, असे आवाहन देखील गुलाबराव पाटील यांनी यावेळी केले. या सभेप्रसंगी संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी उपस्थित शेतकऱ्यांना केळीविषयी माहिती दिली. यावेळी शेतकऱ्यांच्या शंका आणि प्रश्नांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने निराकरण करण्यात आले.