जळगाव - 'रेमडेसिवीरच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मध्यरात्री पोलीस ठाण्यात जावे ही तर शरमेची बाब आहे', अशा शब्दांत शिवसेनेचे नेते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी फडणवीसांवर टीका केली आहे. मंत्री गुलाबराव पाटील हे सोमवारी जळगावात आले होते. अजिंठा शासकीय विश्रामगृहात असताना ते माध्यमांशी बोलत होते.
रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्मिती करणाऱ्या ब्रूक फार्मा कंपनीच्या मालकाला साठेबाजीच्या संशयावरून मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. याची माहिती मिळाल्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे दोघेही पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. याच मुद्द्यावरून सध्या सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगताना दिसत आहे. यावर प्रतिक्रिया देताना गुलाबराव पाटील यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.
काय म्हणाले गुलाबराव पाटील?
यावेळी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी एवढ्याशा कामासाठी पोलीस ठाण्यात जाण्यापेक्षा आपल्या राज्याला रेमडेसिवीर कसे मिळतील, यासाठी पंतप्रधानांना विनंती केली असती तर त्यांचा जयजयकार झाला असता. कारण ते पण राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते आहेत. केंद्रात त्यांचे सरकार आहे. आज रेमडेसिवीर हा सर्वांना भेडसावणारा प्रश्न आहे. त्यात राजकारण न करता, राज्यात लॉकडाऊन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना मदत म्हणून जसे ते बैठकीत सहभागी झाले होते, तशा पद्धतीने रेमडेसिवीर देण्यासाठी त्यांनी मदत करायला हवी होती. अशी जनतेची अपेक्षा होती. ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे, वृत्तवाहिन्यांवर जे दाखवलं जात आहे, ते पाहून आम्हालाही कंटाळा आलाय. विरोधी पक्षनेत्याने अशा पद्धतीने पोलीस ठाण्यात जावे, ही तर शरमेची बाब असल्याचे गुलाबराव पाटलांनी म्हटले आहे.
हेही वाचा - दहावीची परीक्षा रद्द, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा