जळगाव - ज्यांनी शिवसेना संपवून टाकू, असा कायम उल्लेख केला. त्या नारायण राणेंना भाजप प्रवेश देत आहेत. राणेंना प्रवेश द्यावा किंवा नाही, हा भाजपचा अंतर्गत विषय आहे. मात्र, नारायण राणेंना आमचा कायमच विरोध आहे, अशी भूमिका शिवसेनेचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज जळगावात मांडली.
हेही वाचा - अमळनेर विधानसभा मतदारसंघ: सलग दोनदा अपक्षांना काैल, आता आमदारकी कुणाकडे?
नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत सोमवारी सकाळपासून हालचाली सुरू होत्या. यासंदर्भात शिवसेनेच्या वतीने आपली काय भूमिका काय असेल, अशी विचारणा जळगावच्या पत्रकारांनी केली असता गुलाबराव पाटील यांनी राणेंविरोधात असलेली आपली प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा - एरंडोल-पारोळा मतदारसंघ: राष्ट्रवादी काँग्रेससमोर एकमेव जागा टिकवण्याचे आव्हान
एकीकडे भाजप आणि सेनेत विधानसभा निवडणुकीसाठी युतीचा तिढा सुटलेला नाही. त्यातच सोमवारी नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा रंगली होती. राणेंना भाजपत घेऊ नये, अशी भूमिका शिवसेनेने मांडली आहे. याच भूमिकेची री गुलाबराव पाटलांनी प्रतिक्रिया देताना ओढली. ते पुढे म्हणाले, कोणाला पक्षात प्रवेश द्यावा किंवा देऊ नये, हा पूर्णतः भाजपचा अंतर्गत विषय आहे. राणेंच्या भाजप प्रवेशाला सेनेने कायम विरोध केला आहे. आमचे मंत्री दीपक केसरकर यांनी देखील त्याबाबत भूमिका जाहीर केली आहे. परंतु, या विषयाबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो आदेश देतील, तो आदेश आम्ही पाळू, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.