जळगाव - महाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेतील नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या एकनाथ खडसे यांच्यासह 12 जणांच्या नावांच्या यादीला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मंजुरी देतात की नाही? याबाबत राज्याच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. असे असताना राज्यपाल कोश्यारींनी खडसेंचे विधानसभेतील योगदान तसेच समाजसेवेबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. एवढेच नाही तर खडसेंना सदिच्छाही दिल्या आहेत. राज्यपालांनी खडसेंचे अभिनंदन त्यांच्या विधान परिषदेतील नियुक्तीबद्दल नव्हे तर खडसेंचे खंदे समर्थक भुसावळ येथील प्रा. डॉ. सुनील नेवे यांनी लिहिलेल्या 'जनसेवेचा मानबिंदू : एकनाथराव खडसे' या पुस्तकाबाबत अभिप्राय देताना केले आहे.
प्रा. सुनील नेवे यांनी एकनाथ खडसे यांच्या जीवनकार्याचा आढावा घेणारे पुस्तक लिहिले आहे. सप्टेंबर महिन्यात या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते. पुस्तक प्रकाशनावेळी खडसेंनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आपल्याला भाजपात फडणवीसांनी खूप त्रास दिल्याचा आरोप केला होता. त्यामुळे हे पुस्तक चर्चेचा विषय ठरले होते. आता पुन्हा या पुस्तकाच्या माध्यमातून राज्यपाल कोश्यारी यांनी खडसेंचे अभिनंदन केल्याने हे पुस्तक पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
काय म्हटले आहे राज्यपालांनी आपल्या अभिप्रायात?
पुस्तकाच्या माध्यमातून आपले व्यक्तिमत्व, समाजकारण, राजकारण, संसदीय कार्य, वैचारिक भूमिका तसेच विधानसभा सदस्य म्हणून योगदान, यासह आपल्या व्यापक सेवाकार्याचा अभ्यासपूर्ण आलेख मांडला आहे. यानिमित्त मी आपले हार्दिक अभिनंदन करतो व आपणास सुयश चिंतितो. लेखक डॉ. सुनील नेवे यांनी अभ्यासपूर्ण संशोधन करून लिहिलेला हा ग्रंथ संग्रहीत ठेवावा, असा झाला आहे. त्याबद्दल त्यांचेदेखील मी अभिनंदन करतो.
हेही वाचा - चक्क बनावट सोने ठेवून बँकेची फसवणूक; दाम्पत्याचा कारनामा 'असा' आला उघडकीस