जळगाव - सोन्याचे दर सलग तिसऱ्या दिवशी कमी झाले आहेत. गुरुवारी 1 हजार 200 रुपयांची घसरण झाल्यानंतर, शुक्रवारी सकाळी सराफ बाजाराला सुरुवात होताच सोन्याचे दर पुन्हा दीडशे रुपयांनी खाली आले. जळगाव सराफ बाजारात शुक्रवारी सकाळी सोन्याचे दर 46 हजार 940 इतके नोंदवले गेले. विक्रीसाठी जीएसटीसह हे दर 48 हजार 348 असे आहेत.
सहा महिन्यांपूर्वी गाठला होता 58 हजारांचा टप्पा-
कोरोना काळात सहा महिन्यांपूर्वी सोन्याच्या दराने 58 हजार रुपयांचा टप्पा गाठला होता. त्यावेळी सर्वच तज्ञांचे अंदाज चुकले होते. आता त्या उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. सहा महिन्यांपूर्वी 58 हजारांच्या घरात गेलेले सोन्याचे दर आता कमालीचे घसरले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील उलाढालीचा थेट परिणाम होत असल्याने सोन्याचे दर खाली येत असल्याचे तज्ञांचे मत आहे.
डॉलरचे अवमूल्यन ठरतेय प्रमुख कारण-
सोने व चांदीच्या दरांवर आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा मोठा परिणाम होत असतो. सध्या अमेरिकन डॉलरचे मोठ्या प्रमाणावर अवमूल्यन होत असल्याने सोने व चांदी या दोन्ही धातूंचे दर घसरत आहेत. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया काहीअंशी मजबूत होत असल्याने सोने व चांदीचे दर अस्थिर आहेत. डॉलरमधील चढउतार सोन्याचे दर कमी होण्यामागचे प्रमुख कारण मानले जात आहे.
सोन्यात घसरण सुरूच-
जळगावच्या सराफ बाजारात सोमवारी (14 जून) सोन्याचे दर 48 हजार 345 इतके होते. त्यानंतर मंगळवारी (15 जून) सोन्याच्या दरात प्रतितोळा 253 रुपयांची वाढ झाल्याने दर 48 हजार 598 झाले होते. बुधवारी (16 जून) सोन्याचे दर 254 रुपयांनी खाली आल्याने 48 हजार 344 रुपये प्रतितोळा झाले होते. गुरुवारी सोन्याच्या दरात पुन्हा 1 हजार 200 रुपयांची मोठी घसरण नोंदवली गेली. गुरुवारी जळगावात सोन्याचे दर प्रतितोळा 47 हजार 100 रुपये असे होते. 3 टक्के जीएसटीसह सोन्याचे दर 48 हजार 378 रुपये होते. त्यानंतर शुक्रवारी सकाळी सराफ बाजारात आर्थिक व्यवहारांना सुरुवात होण्यापूर्वीच सोन्याचे दर पुन्हा दीडशे रुपयांनी घसरले. बुधवारनंतर सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे दर कमी झाले आहेत.
अशी झाली आहे घसरण-
बुधवार- 254 रुपयांची घट, दर 48 हजार 344
गुरुवार- 1200 रुपयांची घट, दर 47 हजार 100
शुक्रवार- 160 रुपयांची घट, 46 हजार 940