जळगाव - आंतरराष्ट्रीय बाजारात घडणाऱ्या घडामोडींमुळे सोने आणि चांदीचे दर पुन्हा एकदा वधारले आहेत. जळगावात आज सराफा बाजार सुरू झाल्यानंतर सोन्याचे दर जीएसटी मिळून 58 हजार 300 रुपये प्रतितोळा, तर चांदीचे दर जीएसटी मिळून 77 हजार रुपये प्रतिकिलो झाले.
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर सातत्याने कमी-जास्त होत आहेत. त्यामुळे सराफा बाजारातील उलाढालींवरदेखील मोठ्या प्रमाणावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात अशीच परिस्थिती कायम राहिली तर सोने लवकरच 65 हजार आणि चांदी एक लाख रुपयांचा पल्ला गाठेल, असा सराफा व्यावसायिकांचा अंदाज आहे.
सध्या कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर घडामोडी घडत आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचा थेट परिणाम झाला आहे. भारतासह अमेरिका, रशिया, चीन अशा देशातील बडे गुंतवणूकदार कोणत्याही प्रकारची जोखीम नको म्हणून 'एक्सचेंज ट्रेडेड फंड' (ईटीएफ) मध्ये मोठ्या प्रमाणावर सोने आणि चांदी खरेदी करत आहेत. त्यामुळे आपल्याकडे सोने आणि चांदीचे दर वाढत आहेत. सध्या जागतिक अर्थव्यवस्थेची परिस्थिती पाहता गुंतवणूकदार गुंतवणुकीतील सुरक्षितता आणि योग्य परतावा या दोन बाबींचा विचार करून सोने आणि चांदी खरेदीला प्राधान्य देत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदी खरेदी-विक्रीवर सट्टा लावला जात आहे. त्यामुळे सध्या सोने-चांदीसह सर्व मौल्यवान धातूंचे दर अस्थिर आहेत, असे तज्ज्ञांचे मत आहे.
सोने-चांदीच्या दरात आतापर्यंतची विक्रमी वाढ -
गेल्या आठवडाभरापासून सोने आणि चांदीच्या दरात वाढ सुरूच आहे. आठवडाभरापूर्वी जळगावात सोन्याचे दर 52 हजार 500 रुपये प्रतितोळा, तर चांदीचे दर 63 हजार रुपये प्रतिकिलो असे होते. आज सराफा बाजार सुरू झाल्यानंतर सोन्याचे दर जीएसटी मिळून 58 हजार 300 रुपये प्रतितोळा, तर चांदीचे दर हे जीएसटी मिळून 77 हजार रुपये प्रतिकिलो नोंदवले गेले. एकाच आठवड्यात सोन्याचे सुमारे सहा ते साडेसहा हजाराने, तर चांदीचे दर 15 हजार रुपयांनी वाढले आहेत. सोने-चांदीच्या दरात आतापर्यंतची ही विक्रमी वाढ आहे, अशी माहिती जळगावातील बाफना ज्वेलर्सचे संचालक पप्पू बाफना यांनी 'ई-टीव्ही भारत'शी बोलताना दिली.
सराफा बाजारात मंदी -
आंतरराष्ट्रीय बाजारात असलेल्या अस्थिरतेमुळे सोने आणि चांदीचे दर सतत कमी जास्त होत आहेत. याचा सराफा बाजारातील आर्थिक उलाढालीवर मोठा परिणाम झाला आहे. ग्राहक सोने-चांदी खरेदी करण्यासाठी फारसे उत्सुक नाहीत. ही परिस्थिती कधी सुरळीत होईल याबाबत अनिश्चितता आहे, असे पप्पू बाफना यांनी सांगितले.