जळगाव - जागतिक बाजारपेठ आर्थिक मंदीत सापडली आहे. त्यातच आता जगभरात कोरोना विषाणूचे थैमान सुरू असल्याने जागतिक बाजारपेठ अनिश्चिततेच्या फेऱ्यात अडकली आहे. याच प्रमुख कारणांमुळे सध्या सोने-चांदीच्या दरात चढ-उतार सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. सोन्याचे दर सध्या विक्रमी पातळीवर असून सोमवारी सुवर्णनगरी असलेल्या जळगावात सोन्याचे दर 44 हजार 500 रुपये प्रतितोळा, तर चांदीचे दर 48 हजार रुपये प्रतिकिलो होते. सोन्याचे दर आवाक्याबाहेर गेल्याने लग्नसराई असताना ग्राहक आपला हात आखडता घेत आहेत. त्यामुळे सराफ बाजारावर मंदीचे सावट असल्याचे पाहायला मिळत आहे.
लग्नसराई चालू असल्याने सराफा बाजारात मोठी आर्थिक उलाढाल अपेक्षित आहे. मात्र, सोने व चांदीच्या दरातील अस्थिरतेमुळे सराफा बाजारात मंदी आहे. सतत वाढणाऱ्या दरांमुळे अनेकजण खिशाचा विचार करूनच खरेदी करत आहेत. जळगावच्या सराफा बाजारात दररोज होणारी कोट्यवधी रुपयांची उलाढाल लाखोंवर आली आहे. त्यामुळे सराफा व्यवसाय धोक्यात आला आहे.
अलीकडच्या काळात जागतिक बाजारपेठ अस्थिर असल्याने सोन्याचे दर दिवसागणिक नव्या विक्रमावर पोहोचत आहेत. जळगावात सोने 45 हजार रुपये प्रतितोळ्याच्या उंबरठ्यावर आहे. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचे दर एकाच दिवशी तब्बल 1 हजार 300 रुपयांनी वधारून 43 हजार 800 रुपयांवर गेले होते. चांदीचे दरही या दिवशी 700 रुपयांनी वाढले होते. सोने-चांदीच्या दरात चढ-उतार सुरू असल्याने व्यापाऱ्यांचे अंदाज चुकत आहेत. दरम्यान, सोने आणि चांदीचे दर सतत वाढत असल्याने सर्वसामान्यांना सोने-चांदी खरेदी करणे जवळपास अशक्य झाले आहे. जागतिक बाजारपेठेवर मंदीचा प्रभाव आहे. कोरोना विषाणूच्या थैमानामुळे शेअर मार्केट देखील खाली आले आहे. अशा स्थितीत गुंतवणुकीचा शाश्वत मार्ग म्हणून गुंतवणूकदारांची पावले सोने-चांदीच्या बाजारपेठेकडे वळत आहेत. याच कारणामुळे सोने-चांदीचे दर प्रचंड अस्थिर आहेत.