जळगाव - अश्लील छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत एका अल्पवयीन मुलीवर तिच्या दोन मित्रांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना जळगावात घडली. दोघांपैकी एकाने मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार केला. तर दुसऱ्याने मोबाईलमध्ये काढलेली दोघांची अश्लील छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केला. दोघांच्या त्रासाला कंटाळलेल्या मुलीने अखेर हा प्रकार घरी सांगितल्यानंतर बुधवारी रात्री शनिपेठ पोलीस ठाण्यात दोन्ही तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेजस दिलीप सोनवणे (वय २०) व चेतन पितांबर सोनार (वय २०) अशी गुन्हा दाखल झालेल्या तरुणांची नावे आहेत.
या प्रकरणातील पीडित मुलगी ही १७ वर्षीय आहे. सर्वजण शनिपेठ पोलीस ठण्याच्या हद्दीत राहणारे आहेत. तेजस याने दीड वर्षांपूर्वी या मुलीसोबत प्रेमसंबंध प्रस्तापित केले होते. त्यानंतर दोघांचे भेटणे सुरू होते. २८ फेब्रुवारी २०१९ रोजी तेजसने या मुलीस दुचाकीवरुन शहरातील कोल्हे हिल्स परिसरात नेऊन एका भिंतीच्या आडोशाला तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, याचवेळी तेजसचा मित्र चेतन हा देखील दोघांच्या मागे कोल्हे हिल्स परिसरात गेला होता. चेतनने दोघांना काहीच कळू न देता दोघांची छायाचित्रे स्वत:च्या मोबाईलमध्ये काढली होती.
यानंतर काही दिवसांनी तेजस आणि पीडित मुलगी यांचे बोलणे बंद झाले होते. दोघांचे बोलणे बंद झाल्याचा गैरफायदा घेत चेतन सोनार याने पीडितेशी मैत्री वाढविली. वर्षभर चाललेल्या मैत्रीनंतर चेतनने पीडितेला गोड बोलून फेब्रुवारी २०२० मध्ये पुन्हा कोल्हे हिल्स येथे नेले. त्याठिकाणी त्याने पीडितेला यापूर्वी तेजसने केलेल्या अत्याचाराची छायाचित्रे दाखवली. तेव्हा तिला धक्काच बसला. ही छायाचित्रे सोशल सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत चेतनने देखील मुलीवर अत्याचार केला.
या प्रकारामुळे पीडित मुलीच्या मनावर आघात झाला. दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून तेजस आणि चेतन या दोघांनी पीडित मुलीच्या घराजवळ येऊन तिच्या नावाने शेरेबाजी करण्यास सुरुवात केली. तसेच अश्लील छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन पुन्हा दोघांसोबत संबंध ठेवण्याबाबत दबाव टाकत होते. हे सर्व असह्य झाल्याने आपल्यासोबत घडलेला प्रकार पीडित मुलीने आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलीस ठाण्यात तेजस आणि चेतन या दोघांविरुद्ध अत्यावर व पोस्को कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघे झाले पसार -
आठ दिवसांपासून तेजस आणि चेतन हे दोघे पीडित मुलीस त्रास देत होते. तिच्या वडिलांना देखील धमकावत होते. त्यांचा हा प्रकार वाढत असल्यामुळे अखेर पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेतली. दरम्यान, आपल्यावर गुन्हा दाखल होणार असल्याच्या भीतीने दोघेजण शहरातून पसार झाले आहे. शनिपेठ पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी पथक रवाना केले आहे. दरम्यान, तेजस सोनवणे हा शहरातील एका मोठ्या राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकारीचा मुलगा आहे.