जळगाव - जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील दाभाडी येथील एका 15 वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी घडली. मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी ‘आय लव्ह यू ऋषिकेश, तुला माहिती नसेल मी तुझ्यावर किती प्रेम करते. ए ऋषी तुने जर मला विसरण्याची कोशीश केली ना...’ असा मजकूर असलेली एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. सध्या सुरू असलेल्या व्हॅलेंटाईन वीकमध्ये 'प्रपोज डे'च्या दिवशीच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
आत्महत्या करणारी मुलगी ही नववीच्या वर्गात शिकत होती. तिचे वडील कामानिमित्ताने कोल्हापूरला वास्तव्यास आहेत. तर आई शेतमजूरीचे काम करते. ती मुलगी आणि तिचा लहान भाऊ मालदाभाडी येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत.
आजीने दरवाजा उघडल्यानंतर घटना आली उजेडात -
सोमवारी दुपारी मुलीची आजी ती घरी आली की नाही, हे पाहण्यासाठी घरी आल्या. तेव्हा घराचा दरवाजा बंद होता. त्यांनी तो उघडताच छताला लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह दिसून आला. त्यांनी आरडाओरड केली असताना आजूबाजूचे नागरिक धावत आले. यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पंचनामा केल्यावर मृतदेह जामनेर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.
हेही वाचा - प्रेयसीला पेटविताना प्रियकरही होरपळला, मुंबईतील घटनेत दोघांचाही मृत्यू
चिठ्ठीत ऋषिकेश नावाच्या मुलाचा उल्लेख?
मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात तिने 'आय लव्ह यू ऋषिकेश, तुला माहिती नसेल मी तुझ्यावर किती प्रेम करते. ए ऋषी तुने जर मला विसरण्याची कोशीश केली ना...' असा मजकूर लिहिला आहे. यामुळे चिठ्ठीत उल्लेख असलेला ऋषिकेश कोण? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. याप्रकरणी मुलीचे मामा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय चोपडे (वय 25) व ऋषिकेश (दोन्ही रा. नवी दाभाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी अक्षयला अटक केली आहे.
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर अत्याचाराचे कलम वाढवले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा गुंता वाढला आहे.