जळगाव - अवघ्या ३ महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीत प्रमुख विरोधक असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडी करूनही २८८ पैकी ५० जागाही मिळणार नाहीत, असा दावा राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटनांचा आढावा घेण्यासाठी जळगाव जिल्हा भाजपची ग्रामीण व महानगर कार्यकारिणीची बैठक शनिवारी (२९ जुलै) सायंकाळी जळगावातील ब्राह्मण सभेच्या सभागृहात पार पाडली. या बैठकीत ते बोलत होते.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना गिरीश महाजन पुढे म्हणाले, 'आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे सक्षम नेतृत्व मिळाले आहे. पक्षाचे संघटन अजून मजबूत करायचे असल्याने भाजपची सदस्य संख्या वाढवा. आपल्याला परिस्थिती अनुकूल आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती बिकट आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज कोणीही राहायला तयार नाही, या बाबीचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे', असेही गिरीश महाजन म्हणाले.
काँग्रेस-राष्ट्रवादीवर लोकांचा विश्वास नाही-
गिरीश महाजन यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधत पुढे म्हणाले, की 'मी खात्रीने सांगतो आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना २८८ पैकी ५० जागाही मिळणार नाहीत. त्यांना कितीही महाआघाडी करू द्या, नाही तर एकत्र येऊ द्या. जसजशी निवडणूक जवळ येईल, तसतशी त्यांच्या जागांची शक्यता कमी होईल.
'महाजन' आडनावामुळे प्रदेशाध्यक्ष पदाला मुकलो-
राज्याचा सरचिटणीस म्हणून काम केल्यानंतर मला प्रदेशाध्यक्ष पदाची अपेक्षा होती. तसा आग्रह देखील मी पक्षाच्या श्रेष्ठींकडे धरला होता. पण पक्षश्रेष्ठींनी मला माझ्या महाजन आडनावामुळे प्रदेशाध्यक्षपद नाकारले. महाजन आडनावामुळे मी प्रमोद महाजन यांचा नातेवाईक वाटेल आणि त्यांच्या नातेवाईकाला प्रदेशाध्यक्षपदी नेमले, असा चुकीचा संदेश जाईल म्हणून मला प्रदेशाध्यक्ष पद नाकारण्यात आले, अशी खंतही महाजन यांनी व्यक्त केली.
खडसे-महाजन यांचे एकमेकांना चिमटे-
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात जिल्ह्याच्या नेतृत्वावरून असलेले हाडवैर जगजाहीर आहे. त्यांच्यातील मनभेदाचे दर्शन देखील या बैठकीत झाले. बैठकीत आपापल्या भाषणात खडसे आणि महाजन यांनी एकमेकांना जोरदार चिमटे काढण्याची संधी दवडली नाही. लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या यशाचे मूल्यमापन करताना एकनाथ खडसे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतिसुमने उधळली. तर गिरीश महाजन यांनी भाजप हा तत्त्व, सिद्धांतांवर चालणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, असे सांगत लोकसभा निवडणुकीतील यश हे संपूर्ण पक्षसंघटनेचे यश असल्याचा उल्लेख करत खडसेंचा मुद्दा खोडून काढला.
खडसे आपल्या भाषणात म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश हे माझे किंवा तुमचे नाही. सर्वांच्या परिश्रमाचे ते म्हणता येईल. पण ते एका मंत्र्याचे किंवा मुख्यमंत्री फडणवीस यांचे आहे, असे मानायला मी तयार नाही. गेल्या पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या कामाचे हे यश आहे. मोदींच्या नेतृत्त्वाचे हे यश आहे, असा उल्लेख खडसेंनी केला.
खडसेंनी केलेल्या उल्लेखाचा धागा पकडून गिरीश महाजन म्हणाले की, भाजप हा पक्ष कुणाची खासगी मालमत्ता नाही. इथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणे घराणेशाही चालत नाही. काँग्रेस म्हटले की गांधी घराणं तर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार. तसे भाजपचे नाही. भाजप हा तत्त्व आणि सिद्धांतांवर चालणारा पक्ष आहे. हा पक्ष नेत्यांचा नाही तर कार्यकर्त्यांचा आहे. जोपर्यंत कार्यकर्ता आहे, तोपर्यंत पक्षाला कोणीही मागे खेचू शकत नाही. उद्या मी असेल किंवा नसेल, दुसरे कोणी असेल किंवा नसेल. पण पक्ष हा कार्यकर्त्यांच्या बळावर राहणारच आहे. त्यामुळे मी गेलो म्हणजे पक्ष संपला, असे कोणी समजता कामा नये, या शब्दांत महाजन यांनी खडसेंना चिमटा काढला.
या बैठकीला खासदार उन्मेष पाटील, रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे, स्मिता वाघ, हरिभाऊ जावळे, चंदुभाई पटेल, महापौर सीमा भोळे, जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, संघटनमंत्री किशोर काळकर यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.