जळगाव - कोरोना संसर्गाचा वेग जळगाव जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहे. जिल्हा प्रशासनाला शुक्रवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये तब्बल 54 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण रुग्णसंख्या 2074 वर जाऊन पोहोचली आहे. जळगाव जिल्ह्यात गुरुवारीदेखील तब्बल 135 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशीही अर्धशतकी पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.
जिल्हा प्रशासनाला शुक्रवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये सर्वाधिक 13 रुग्ण हे जळगाव शहरात आढळले आहेत. त्या खालोखाल प्रत्येकी 7 रुग्ण जळगाव ग्रामीण तसेच एरंडोल याठिकाणी आढळून आले आहेत. जळगाव शहरातील रुग्णसंख्येचा वेग कमी होत नसल्याने भीती कायम आहे. भुसावळ, अमळनेर, यावल, रावेर, एरंडोल, जामनेर तसेच पारोळा या ठिकाणीदेखील सातत्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत.
शुक्रवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये जळगाव शहर 13, जळगाव ग्रामीण 7, भुसावळ 3, अमळनेर 6, पाचोरा 1, धरणगाव 3, यावल 5, एरंडोल 7, जामनेर 3, रावेर 4, पारोळा 1, बोदवड 1 असे एकूण 54 नवे पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले. दरम्यान, जिल्ह्यातील 6 तालुक्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येने शतकी टप्पा पार केला आहे. तर जळगाव शहर, भुसावळ या 2 ठिकाणी त्रिशतकी तसेच अमळनेरातही कोरोनाचे अडीचशेहून अधिक रुग्ण झाले आहेत. एरंडोल, भडगाव आणि जळगाव ग्रामीण या 3 तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णसंख्या शतकाच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.