जळगाव - विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने रविवारी सायंकाळी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात जळगाव जिल्ह्यातील यावल-रावेर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार शिरीष चौधरी यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. शिरीष चौधरींच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याने आता या मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप असा सरळ सामना रंगणार आहे. भाजपकडून विद्यमान आमदार हरिभाऊ जावळे हे उमेदवार असण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - पर्यावरण संरक्षणासाठी लढणाऱ्या 'ग्रेटा थनबर्ग'च्या समर्थनासाठी सरसावले जळगावकर
रावेर विधानसभा मतदारसंघ सध्या भाजपच्या ताब्यात आहे. २०१४ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी नसल्याचा फटका काँग्रेसचे माजी आमदार शिरीष चौधरींना बसला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गफ्फार मलिक यांनी ३१ हजार २७१ मते घेतली होती. त्यामुळे भाजपचे हरिभाऊ जावळे यांच्याकडून १० हजार मतांनी शिरीष चौधरींना पराभव स्वीकारावा लागला. यावेळी मात्र, दोन्ही काँग्रेसची आघाडी झाल्याने काँग्रेसचे उमेदवार चौधरी भाजपला चांगली लढत देऊ शकतात. मागील काही वर्षांत काँग्रेसचे माजी मंत्री मधुकरराव चौधरी यांचे या मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व होते. त्यांच्या पश्चात या मतदारसंघावर भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी प्रभाव निर्माण केला.
हेही वाचा - सक्तवसुली संचालनालयाला चौकशीत सहकार्य करणार- ईश्वरलाल जैन
जळगाव जिल्ह्यात भाजपचा बालेकिल्ला मजबूत झाल्यानंतर रावेरमध्येही काँग्रेसचा प्रभाव हळूहळू ओसरला. गेल्या पाच वर्षांच्या काळात भाजपचे विद्यमान आमदार हरिभाऊ जावळे यांनी विविध विकासकामांच्या माध्यमातून मतदारसंघात आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे प्रमुख राजकीय विरोधक असलेले शिरीष चौधरी यांना मात्र, पूर्वजांकडून मिळालेला राजकीय वारसा पुढे यशस्वीपणे चालवता आला नाही. मात्र, मतदारसंघात पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यात कमी पडलेले हरिभाऊ जावळेंच्या विरोधात असलेल्या जनक्षोभाचा लाभ उचलण्यात चौधरी काही अंशी यशस्वी झाले आहेत. त्यामुळे भाजपचा प्रभाव कायम असला तरी जावळेंना यावेळी मैदान मारणे सोपे नाही.
हेही वाचा - पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघ : युती न झाल्यास तिरंगी लढाईची शक्यता
दरम्यान, भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी देखील या मतदारसंघात अपक्ष उमेदवारी करण्याची तयारी केली आहे. विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे. अनिल चौधरींच्या उमेदवारीमुळे या ठिकाणी तिरंगी लढत असेल. मात्र, खरी लढत ही काँग्रेस आणि भाजपमध्ये होणार आहे. आता अनिल चौधरींच्या उमेदवारीमुळे मतांचे विभाजन झाले तर कोणाला फटका बसेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.