जळगाव - जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात सोमवारी (दि. 30) रात्री ढगफुटीसदृश्य पाऊस पडला आहे. त्यामुळे गिरणा, तितूर आणि डोंगरी या तिन्ही नद्यांना मोठ्या प्रमाणावर पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात चाळीसगाव तालुक्यातील सुमारे 15 गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. दरम्यान, वाकडी गावातील 63 वर्षीय वृद्ध कलाबाई पांचाळ या वाहून गेल्या आहेत. तर पिंपरखेड येथे एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह वाहून आला आहे.
हेही वाचा - जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस; गिरणा, तितूर नद्यांना पूर
-चाळीसगाव शहरासह आजूबाजूच्या वाकडी, रोकडे, वाघडू, वाघळी, खिर्डे, लोंजे, जांभळी, मुंदखेडे, रहिपुरीसह 15 गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे.
-चाळीसगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये पुरामुळे शेकडो गुरे वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
-काही गावांमध्ये लोक अडकले असून, त्यांना रेस्क्यू करण्यासाठी एसडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. या पथकात 35 जणांचा समावेश असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर रावळ यांनी दिली आहे.
-पुराच्या घटनेची माहिती मिळताच आमदार मंगेश चव्हाण, माजीमंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, तहसीलदार अमोल मोरे आदींसह इतर विभागाचे अधिकारी चाळीसगावात दाखल झाले आहेत.
-पिंपरखेड या गावी पुराच्या पाण्यात एका अनोळखी इसमाचा मृतदेह वाहून आला असून, त्याची ओळख पटलेली नाही.
-कन्नड घाटात दरड कोसळली असून, रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर दगड व मातीचे ढीग पडलेले आहेत. ते दूर करण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने प्रयत्न सुरू आहेत. याठिकाणी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी पाहणी केली. दरम्यान, पूरग्रस्तांना सर्वोतोपरी मदत केली जात आहे. परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेऊन आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.
हेही वाचा - जनआशीर्वाद यात्रा, मारामारी चालते; फक्त सणांमधूनच कोरोना पसरतो का? - राज ठाकरे
जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस -
गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार हजेरी लावली आहे. चाळीसगाव, भडगाव आणि पाचोरा तालुक्यातील काही भागांमध्ये सोमवारी रात्री मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे या परिसरातील गिरणा व तितूर नद्यांना पूर आला आहे. तितूर नदीला आलेल्या पुरामुळे कजगाव-नागद, खाजोळा-नेरी-नागद रस्ता बंद झाला आहे. या गावांचा रात्रीपासून संपर्क तुटला आहे.