चाळीसगाव (जळगाव) - गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढली असून त्यामुळे धरणातील पाण्याचा विसर्ग 2 हजार 500 वरुन 5 हजार क्युसेक केला आहे. तर, धरणाचे चार दरवाजे एक फुटापर्यंत उचलण्यात आले असून मन्याड धरणातून ही दीड हजार क्युसेक विसर्ग गिरणा नदीपात्रात साेडण्यात आल्याने नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाहाचा वेग वाढला आहे.
पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे गिरणा धरणात पाण्याची आवक वाढल्याने शुक्रवारी (दि. 18 सप्टें.) मध्यरात्री आणखी अन्य दाेन दरवाजे एक फुटापर्यंत उचलण्यात आले आहे. त्यामुळे धरणातून नदीपात्रात जवळपास 5 हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. शनिवारीही सकाळी गिरणा धरणात ठेंगोडा, चणकापूर व हरणबारी या धरणासह वरच्या भागातून पाण्याची आवक वाढल्याने गिरणा धरणातून साेडण्यात आलेला विसर्ग कायम हाेता. धरणात शंभर टक्के जलसाठा राखला जात असून अतिरिक्त पाणी नदीपात्रात साेडण्यात येत आहे. आता धरणाच्या 14 दरवाज्यांपैकी 1, 2, 5 आणि 6 या चार दरवाज्यांमधून 5 हजार क्युसेक इतका विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.
गावांना सतर्कतेचा इशारा
धरणातून पाणी सोडल्याने गिरणा नदीला पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकिनारी गावकऱ्यांनी तसेच नागरिकांनी नदीत जाऊ नये, असा इशारा गिरणा पाटबंधारे विभागाकडून दिला आहे. गिरणा धरण अनेक वर्षांनी पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे शेकडो गावांचा पाणी प्रश्न निकाली निघाला आहे. पाटबंधारे विभागाकडून धरणावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
हेही वाचा - मुगाला सात हजारांचा हमीभाव, मात्र पावसाने उत्पादन घटले