जळगाव - किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात तरुणाचा खून केल्याप्रकरणी, येथील एकाच कुटुंबातील पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने शनिवारी दुपारी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. शिक्षा झालेल्या आरोपींमध्ये तीन पुरुष तसेच दोन महिलांचा समावेश आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जे. कटारिया यांच्या न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.
सत्त्यासिंग मायासिंग बावरी (वय ४५), रवीसिंग मायासिंग बावरी (वय २७), मलीनसिंग मायासिंग बावरी (वय २५), मालाबाई मायासिंग बावरी (वय ६३) व कालीबाई सत्त्यासिंग बावरी (वय ४३) अशी शिक्षा झालेल्या पाच आरोपींची नावे आहेत. हे सर्व जण जळगाव शहरातील राजीव गांधीनगमधील रहिवासी आहेत.
महापालिकेतील कर्मचारी राहुल प्रल्हाद सकट (वय २२, रा. राजीव गांधीनगर, जळगाव) याचा आरोपींनी मारहाण करत खून केला होता. दि. १२ जुलै २०१७ रोजी राहुल सकट याचा पगार झालेला होता. त्यावेळी आरोपी सत्यासिंग मायासिंग बावरी याने राहुलकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. परंतू, राहुलने पैसे दिले नाहीत. याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर रात्री १० वाजेच्या सुमारास सत्यासिंग बावरी व त्याचे भाऊ रवीसिंग बावरी, मलिंगसिंग बावरी, आई मालाबाई बावरी, पत्नी कालीबाई बावरी असे राहुलच्या घरासमोर आले. त्यांनी शिवीगाळ करून राहुलला लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी राहुलची आई माळसाबाईने विरोध केला असता सत्यासिंग व रवीसिंगने त्यांना भिंतीवर ढकलून दिले. त्यामुळे माळसाबाईंच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर सत्यासिंगने धारदार शस्त्राने राहुलच्या पोटाच्या डाव्या बाजूला चाकू खुपसून गंभीर दुखापत केली. या घटनेनंतर राहुलचा भाऊ अजय सकट याने रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आरोपींविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता.
उपचारादरम्यान राहुलचा मृत्यू
दरम्यान, राहुल सकट याची प्रकृती खालावल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे रवाना करण्यात आले होते. परंतू, नाशिक जवळच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर नाशिक येथेच त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. यानंतर आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी ऑक्टोबर २०१७ मध्ये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. २६ नोव्हेंबर २०१७ पासून या खुनाच्या खटल्याला सुरुवात झाली होती.
१४ साक्षीदार तपासले
या खटल्यात एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले होते. त्यात मनोज नाणे, अरविंद पाटील, फिर्यादी अजय सकट, योगेश जाधव, प्रत्यक्षदर्शी रमेश झेंडे, प्रवीण सोनवणे, म्हाळसाबाई सकट, चंद्रकांत हतांगडे, डॉ. जितेंद्र विसपुते, डॉ. प्रवीण पाटील, पोलीस शिपाई सुरेश मेढे, पोलीस उपनिरीक्षक राजेश घोळवे, पोलीस निरीक्षक रोहिदास ठोंबरे, डॉ. निखिल सैंदाणे यांचा समावेश होता. अंतिम सुनावणीनंतर शनिवारी या खटल्यातील पाचही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच 1 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिन्यांची साधी कैद देखील सुनावण्यात आली आहे.