जळगाव - शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या आशीर्वाद पॉलिमर्स या चटई निर्मिती कारखान्याला सकाळी अचानक आग लागली. आगीत कारखान्यातील सर्व माल तसेच इतर साहित्य जळून खाक झाले असून सुमारे ८ ते १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.
हेही वाचा - 'आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी देणार पाठींबा'
आशीर्वाद पॉलिमर्स या कारखान्यात चटई निर्मितीसाठी लागणारे प्लास्टिकचे दाणे गोदामात साठविण्यात आले होते. त्याला आग लागल्याने काही क्षणात संपूर्ण कारखान्याचा परिसर आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. प्लास्टिकचे दाणे असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करूनही आग तातडीने आटोक्यात आली नाही. सुमारे अडीच तासांहून अधिक काळ अग्निशमन दलाचे कर्मचारी ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत होते. अखेरीस चार अग्निशमन बंबांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
हेही वाचा - ईशान्य मुंबईतील दोन नगरसेवक झाले आमदार!
चटई निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान, ही आग कशामुळे लागली, याबाबत कारण कळू शकले नाही. शॉर्टसर्किटमुळे कारखान्यात आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.