जळगाव - मधमाशांच्या पोळ्याला उठवण्यासाठी लावलेली आग भडकून खळे भस्मसात झाले. या घटनेत शेतकऱ्याचे 4 ते 5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना शुक्रवारी रात्री साडेसातच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील गडखांब येथे घडली.
गडखांब येथील शिरीष नथू पाटील यांच्या शेतातील खळ्याजवळ एका झाडावर मधमाशांचे पोळं होते. त्याला उठविण्यासाठी कुणीतरी झाडाखाली आग लावली होती. मात्र, रात्री अचानक ही आग भडकल्याने शिरीष पाटील यांच्या खळ्याला लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने शेतातील दादरचा चारा, ठिबक सिंचनाच्या नळ्या, पीव्हीसी पाईप तसेच शेती अवजारे जळून खाक झाले. या घटनेत शिरीष पाटील यांचे सुमारे 4 ते 5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच ग्रामस्थांनी धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, आग आटोक्यात येत नव्हती. त्यानंतर अमळनेर नगरपालिकेचे 2 अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले. रात्री उशिरा आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
सुदैवाने, अग्निशमन दलाचे बंब वेळीच दाखल झाल्याने आग आटोक्यात आली. अन्यथा शिरीष पाटील यांच्या खळ्याशेजारी असलेली इतर खळेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याची भीती होती. अनेक शेतकऱ्यांनी दुभत्या जनावरांसाठी कडब्याचा चारा साठवला आहे. हा चारा जळाला असता. दरम्यान, या घटनेचा पंचनामा करण्याचे आदेश तहसीलदार मिलिंद वाघ यांनी तलाठ्याला दिले आहेत.