जळगाव - जिल्ह्यातील पाचोरा येथील एका हॉटेलला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा घडली. थर्टीफर्स्टसाठी हॉटेलवर केलेल्या विद्युत रोषणाईमुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या दुर्घटनेत हॉटेल पूर्णपणे जळून खाक झाले असून, व्यावसायिकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. थर्टीफर्स्टच्या आदल्या रात्रीच ही घटना घडल्याने हॉटेल व्यावसायिकावर संकट कोसळले आहे.
पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ सुरेश मराठे यांचे भाग्यलक्ष्मी हॉटेल आहे. थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर मराठे यांनी हॉटेलवर विद्युत रोषणाई केलेली होती. विद्युत रोषणाईमुळे शॉर्टसर्किट होऊन बुधवारी रात्री हॉटेलला आग लागली. आगीने क्षणार्धात रौद्र रूप धारण केले. ही बाब लक्षात आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन आग विझवण्याचे प्रयत्न केले. परंतु, आग वाढतच असल्याने नगरपालिकेच्या अग्निशमन बंबांना पाचारण करण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर हॉटेल मालक सुरेश मराठे यांनीही धाव घेतली.
रात्री उशिरा मिळाले आगीवर नियंत्रण-
हॉटेलला लागलेल्या आगीवर रात्री उशीरा नियंत्रण मिळाले. अग्निशमन दलाच्या बंबांनी पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवले. आग नियंत्रणात आली तोपर्यंत हॉटेलचा बराचसा भाग तसेच साहित्य जळून खाक झाले होते. या घटनेची पाचोरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सुरेश मराठे हे हॉटेल व्यावसायिक असून त्यांच्या पाचोरा शहरात ठिकठिकाणी अनेक हॉटेल्स आहेत. या घटनेमुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
हेही वाचा - कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या माहेरात ऐन हिवाळ्यात पाणीटंचाई
हेही वाचा - 'थर्टी फर्स्ट'साठी जिल्ह्यात 578 पोलीस असणार रस्त्यावर