जळगाव - किरकोळ वादाचा वचपा काढण्यासाठी तरुणावर चॉपर हल्ला केल्याची घटना शनिवारी दुपारी १२.३० वाजता रेल्वेस्टेशन परिसरात घडली. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली होती. चेतन संजय करोसिया (वय २५, रा. वाघनगर) असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
चेतन याच्यावर १५ ते २० तरुणांच्या टोळक्याने चॉपरने हल्ला चढवला. करोसिया हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुरक्षारक्षक आहे. शुक्रवारी (१३ मार्च) वाघनगर परिसरात दोन गटांमध्ये किरकोळ वाद झाले होते. यावेळी चेतन याने भांडण मिटवून समतानगरातील तरुणांना तेथून बाहेर काढले होते. याचा राग तरुणांच्या मनात होता. दरम्यान, शनिवारी चेतन करोसिया याच्या मुलाच्या जावळाचा कार्यक्रम होता. त्यानिमित्ताने आलेल्या पाहुण्यांना घेण्यासाठी तो रेल्वेस्थानक परिसरात गेला होता. यावेळी अजय गरुड, बबलु, अक्षय, विजय, रोहित (पूर्ण नाव माहित नाही, सर्व रा. समतानगर) यांच्यासह १५ ते २० तरुणांनी करोसिया याच्यावर हल्ला चढवला. यातील एका तरुणाच्या हातात चॉपर होता. तर काहींनी काचेच्या बाटल्या करोसिया याच्या डाेक्यावर फोडल्या.
काही कळण्याच्या आतच झालेल्या या हल्ल्यामुळे करोसिया भेदरला होता. त्याने बचाव करण्यासाठी पळापळ केली. यामुळे रेल्वेस्थानक परिसरात प्रचंड गोंधळ उडाला होता. मारहाणीनंतर हल्लेखोर तरुण पळून गेले. तर काही नागरिकांनी करोसिया याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.
करोसिया याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर करोसिया याचे कुटुंबीय, मित्रांनी रुग्णालयात प्रचंड गर्दी केली. उपचार सुरू असताना अडचण आल्यामुळे करोसिया याच्या संतप्त मित्रांनी रुग्णालयात दोन तरुणांना मारहाण केली. या प्रकरणी अद्याप पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही.