जळगाव (रावेर) - हवामानावर आधारित केळी पीक विम्याचे नवीन लागू केलेले अन्यायकारक निकष रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांचा गेल्या पंधरा दिवसांपासून लढा सुरू आहे. आमदार शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी एकवटले असून त्यांचा लढा सुरू आहे. याच अनुषंगाने उद्या दुपारी ४ वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे.
हवामानावर आधारित केळी पीक विम्याचे यंदापासून तीन वर्षांसाठी नवीन निकष लागू केले. मात्र, हे निकष शेतकऱ्यांवर अन्यायकारक असल्याने हे निकष रद्द करून जुनेच निकष कायम ठेवण्याची मागणी आमदार शिरीष चौधरी यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली आहे. त्यासाठी चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा खासदार शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री गुलाबराव पाटील, कृषी सचिव एकनाथ डवले यांची भेट घेऊन जाचक निकष बदलण्याची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेत हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत मांडला होता. आता उद्या होणाऱ्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्याचे लक्ष्य लागून राहीले आहे.