जळगाव - गेल्या अनेक वर्षांपासून तापी नदीच्या गाळाच्या प्रदेशात शेतकऱ्यांनी विहिरी, कूपनलिकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर भूगर्भातून पाण्याचा उपसा केला आहे. जेवढ्या प्रमाणात भूगर्भातून पाण्याचा उपसा झाला, त्या प्रमाणात जलपुनर्भरण न झाल्याने आज तापी खोऱ्यात जलपातळी घटून पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. ही समस्या दूर करण्यासाठी जलपुनर्भरण हा एकमेव पर्याय असल्याने प्रस्तावित 'मेगा रिचार्ज स्कीम' ही योजना तातडीने पूर्ण करण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.
भूजल पातळी घटल्याने शेतीला पाणी मिळत नाही. त्यामुळे आता 'पाणी आडवा, पाणी जिरवा', 'पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण', असे उपक्रम राबविण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात पिण्यासाठी देखील पाणी मिळणार नाही. ही परिस्थिती लक्षात घेता मेगा रिचार्ज स्कीम योजना तातडीने पूर्ण केली पाहिजे, अशी या भागातील शेतकऱ्यांची मागणी आहे.
जळगाव जिल्ह्यातील केळी पट्ट्यात पाण्याचे स्त्रोत आटले आहेत. एकीकडे सिंचनासाठी लागणाऱ्या विजेच्या पंपांची अश्वशक्ती वाढली मात्र, दुसरीकडे जलपुनर्भरणाकडे दुर्लक्ष झाल्याने केळी पट्ट्याचे वाळवंट झाले आहे. यावर्षी पाण्याअभावी केळी पट्ट्यात तब्बल 250 ते 300 कोटींचे नुकसान झाले आहे. या परिसराला नवसंजीवनी देण्यासाठी शेळगाव मध्यम प्रकल्प आणि मेगा रिचार्ज स्कीम पूर्ण होण्याची आज खरी गरज आहे. मेगा रिचार्ज स्कीम ही खूप मोठी योजना असून त्यासाठी गेल्या 15 ते 20 वर्षांपासून महाराष्ट्रासह मध्यप्रदेशातील लोकप्रतिनिधी प्रयत्नशील आहेत. आता केंद्रात भाजपचे सरकार बहुमताने सत्तेत असल्याने ही योजना मार्गी लागेल, अशी अपेक्षा आहे.
या योजनेचा सुमारे 10 हजार कोटींचा विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू आहे. ही योजना पूर्ण झाली तर सुमारे 5 लाख हेक्टर जमिनीवर जलपुनर्भरण होणार आहे. त्याचा फायदा मध्यप्रदेश, महाराष्ट्रातील जळगाव, धुळे तसेच नंदुरबार जिल्ह्याला होणार आहे. मेगा रिचार्ज स्कीममध्ये तापी नदीचे पावसाळ्यात गुजरातमध्ये वाहून जाणारे अतिरिक्त पाणी सातपुडा पर्वताच्या पायथ्याकडे वळवले जाणार आहे. तेथेच हे पाणी जमिनीत जिरवण्याची व्यवस्था असेल. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर मेगा रिचार्ज स्कीम योजनेचा विषय आपल्या अजेंड्यावर असून त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसेंनी दिली आहे.