जळगाव - जिल्ह्यात यावर्षी वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. आता आठवडाभरापासून परतीचा जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे खरीप हंगामातील सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. ओल्या दुष्काळाने खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यात मक्याला कोंब फुटल्याने शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याची भावना शेतकऱ्यांची आहे.
जळगाव जिल्ह्यात यंदा पावसाने चांगलीच मजल मारली. खरीप हंगामाच्या पहिल्या दोन महिन्यात येणारे मूग, उडीद या कडधान्य पिकांचे अतोनात नुकसान झाले. जिल्ह्यातील काही तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने कडधान्य पिके अक्षरशः जळून गेली. या धक्क्यातून सावरत नाही तोच आता शेतकऱ्यांसमोर दुसरे संकट उभे राहिले आहे. आठवडाभरापासून जिल्ह्यात परतीचा पाऊस सुरू असल्याने ज्वारी, बाजरी, मका पिकांचे नुकसान झाले आहे. जोरदार पाऊस तसेच सकाळच्या वेळी पडणारे धुके यामुळे ज्वारी, बाजरी, मक्याची कणसे काळी पडली आहेत. काही ठिकाणी तर कणसांना कोंब फुटले आहेत. कापणी झालेली कणसे देखील भिजून कुजली आहेत.
पूर्वहंगामी आणि हंगामी कापसाच्या पिकाला देखील पावसाचा फटका बसला आहे. अतिपावसामुळे कापसाची बोंडे कुजली आहेत. बोंडांमधून बाहेर आलेला कापूस भिजून खराब झाला आहे. अनेक शेतांमध्ये वादळामुळे पिके जमिनदोस्त झाली आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत आले आहेत. सरकारने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून मदत करावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
यावर्षी अतिपावसामुळे ज्वारी, बाजरी तसेच मका पिकांचे निम्म्याहून अधिक म्हणजे सुमारे एक ते सव्वालाख हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे.
जळगाव जिल्ह्यात सलग चार ते पाच वर्षांपासून सातत्याने दुष्काळ पडत होता. यावर्षी वरुणराजाची चांगली कृपादृष्टी राहिल्याने दुष्काळ धुतला गेला खरा; पण ओल्या दुष्काळाने शेतकरी अडचणीतून बाहेर येऊ शकला नाही. अतिपावसामुळे कडधान्य पिके तर हातून गेलीच आहेत. आता पंचनाम्याची प्रतिक्षा शेतकऱ्यांना आहे.