जळगाव - गेल्या वर्षभरापासून संथगतीने सुरू असलेल्या जळगाव ते औरंगाबाद रस्त्याच्या अपूर्णावस्थेतील कामाचा फटका रस्त्यालगत शेती असलेल्या शेतकर्यांना बसतो आहे. रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था केली नसल्याने रस्त्यावरील पाणी शेतांमध्ये साचून पूर्वहंगामी कापूस पिकांचे नुकसान होत आहे.
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात असलेल्या नेरी गावाच्या परिसरात गुरुवारी रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. पहिल्याच पावसात शेतशिवारात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले. पावसाळ्यात या शेतांमधील पाणी वाहून नेणाऱ्या नैसर्गिक चाऱ्या रस्त्याच्या कामामुळे बुजल्या गेल्या आहेत. दुसरीकडे पुलाच्या कामासाठी खोदलेला खड्डा तसेच शेतशिवारामधून येणारे पाणी पुढे जाण्यासाठी कोणतीही पर्यायी उपाययोजना संबंधित ठेकेदाराने केली नसल्यामुळे रस्त्यालगत असलेल्या शेतांमध्ये पाणी साचले आहे. मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शेताला तळ्याचे स्वरूप निर्माण झाले आहे.
साचलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या बागायती कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नेरी बुद्रुक येथील सीताराम खोडपे या शेतकऱ्याच्या शेतात भर उन्हाळ्यात वाढविलेली अडीच एकरावरील कापसाची रोपे पाण्याखाली गेली आहेत. या सर्व प्रकारास रस्त्याच्या कामाचे कंत्राट घेणारा ठेकेदार जबाबदार आहे. ठेकेदाराने संबंधित शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
...अन्यथा काम बंद पाडू -
पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांनी संबंधित ठेकेदाराला या विषयाची कल्पना दिली होती. मात्र, ठेकेदाराने त्याकडे दुर्लक्ष केले. म्हणूनच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतांमध्ये साचलेले पाणी लवकर बाहेर काढण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अन्यथा रस्त्याचे काम बंद पाडू, असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे.