जळगाव - एमडी असल्याचे भासवून एका तोतया डॉक्टरने थेट स्टेथोस्कोप गळ्यात अडकवून वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोग विभागात रुग्णांची तपासणी सुरू केली. एका मुलीच्या वडिलांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्या तोतया डॉक्टरला हटकले. यानंतर पळून जात असलेल्या तोतया डॉक्टरास नागरिकांनी चांगलाच चोप दिला. हा खळबळजनक प्रकार मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास घडला. या घटनेतून वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुकेश चंद्रशेखर कदम (वय २९, रा.मोहाडी) असे या तोतया डॉक्टरचे नाव आहे.
मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास पिवळा टी शर्ट, जीन पॅण्ट घातलेला मुकेश हा गळ्यात स्टेथोस्कोप अडकवून थेट वैद्यकीय महाविद्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील बालरोग विभागात शिरला. आपण एमडी डॉक्टर असल्याचे त्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सांगीतले. यानंतर त्याने एका खोलीतील चार पैकी दोन रुग्णांना छाती, पाठीवर स्टेथोस्कोप लावून तपासले. त्याच्या एका हातात इजेक्शन देण्याचे अॅम्बुल देखील होते. यावेळी खोलीत यावल तालुक्यातील एका १२ वर्षीय बालिका वडिलांसोबत आली होती. या बालिकेच्या पोटात दुखत होते. मुकेश याने तीला देखील तपासले. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे मुलीच्या वडिलांनी त्याला हटकले. बाहेर येऊन सिस्टरला ही माहिती दिली.
‘वॉर्डमध्ये कुणीतरी तरुण डॉक्टर असल्याचे सांगुन मुलीला तपासतो आहे’ अशी माहिती तीच्या वडिलांनी सिस्टरला दिली. यानंतर सिस्टरने येऊन चौकशी केली असता तो तरुण डॉक्टर नसल्याचे निष्पन्न झाले. या प्रकारानंतर मुकेशने वॉर्डातून पळ काढण्यास सुरूवात केली. तेथे उपस्थित नागरिकांनी त्याला पकडून चोप दिला. यानंतर त्याला जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.